परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपये

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे परत करण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च लागणार आहे. इतका पोस्टेज खर्च मंजूर करण्याची मागणी यवतमाळ कृषी विभागाने कृषी आयुक्‍तालयाकडे  केली आहे.  कृषी विभागाकडून जाहिरात क्रमांक ५३४२ ही २४ डिसेंबर २०१३  मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. जाहिरातीद्वारे  शिपाई, पहारेकरी, रोपमळा मदतनीस संवर्गासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्जासोबत ठरावीक रक्‍कमेचा डीडी (धनाकर्ष) देखील  जोडण्याचे जाहिरातीत नमूद होते. त्यानुसार उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी ही पदभरती होती. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यात अर्ज करण्यात आले. या माध्यमातून सुमारे ३५ लाख रुपये कृषी विभागाच्या संबंधित खात्यात जमा झाले.   परंतु त्यानंतर अचानक कृषी विभागाने ही प्रक्रियाच रद्दबातल ठरविली. मात्र कृषी खात्याकडे परिक्षा शुल्क म्हणून जमा असलेले ३५ लाख रुपये परत करण्यात आले नाही. २०१३ पासून या रकमेवर कृषी खात्याला व्याज मिळाल्याचा आरोप परभणी येथील रवीचंद्र काळे यांनी केला आहे. त्यामुळे उमेदवारांची कृषी खात्याकडे पडून असलेली ही रक्‍कम परत मिळावी याकरिता रवीचंद्र काळे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच कृषी विभागाने जाहिरात देत उमेदवारांना परीक्षा शुल्क नेण्याचे आवाहन केले होते. यवतमाळ जिल्हा कृषी विभागाकडे २० हजार उमेदवारांचे परीक्षा शुल्क जमा आहे. आवाहनानंतर यातील केवळ १५ उमेदवारांनी कागदपत्र सादर करून त्यांचे पैसे परत नेले. काही उमेदवार मात्र मोबाईलवरून संपर्क साधत परीक्षा शुल्काबाबत केवळ विचारणा करीत असल्याचे आणि न्यायालयात जाण्याचा इशारा देत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या प्रकरणात आता कृषी आयुक्‍तालय काय भूमिका घेते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पाच जिल्ह्यांत उमेदवारांकडून अर्ज आणि शुल्क मागण्यात आले होते. एकाच जिल्ह्याचा शुल्क परतीचा पोस्टेज खर्च तब्बल सात लाख रुपये असल्याने शुल्कापोटी केवळ ३५ लाख रुपये जमा असलेला कृषी विभाग या खर्चाला मंजुरी देईल किंवा नाही, याबाबतही साशंकता व्यक्‍त केली जात आहे.  शुल्क परतीची तयारी यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने २० हजार उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याची तयारी चालविली आहे. ३५ रुपये प्रती उमेदवार पोस्टेज खर्च याप्रमाणे सुमारे सात लाख रुपयाची गरज त्याकरिता लागणार आहे. त्यामुळे कार्यालयीन खर्चाकरिता ही रक्‍कम मिळावी, अशी मागणी कृषी आयुक्‍तांकडे करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com