सात गावे २० दिवस पाण्याविना !

सात गावे २० दिवस पाण्याविना
सात गावे २० दिवस पाण्याविना

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : तालुक्‍याच्या पूर्व भागातील सात गावे गेली वीस दिवस तहानलेली आहेत. निलजी ते खणदाळ बंधाऱ्यापर्यंतचे हिरण्यकेशी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे. परिणामी ग्रामस्थांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे. यामुळे ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. ३) पाटबंधारे विभागाला पाण्यासाठी साकडे घातले. 

चित्री प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशी नदीत सोडले जाते. या धरणाचे लाभक्षेत्र निलजी बंधाऱ्यापर्यंतच आहे. निलजी बंधाऱ्याखालील पूर्व भागातील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी चित्रीचे पाणी सोडले जाते. खणदाळ बंधाऱ्यापर्यंत प्रत्येक आवर्तनातील पाणी मिळते. या बंधाऱ्यावर खणदाळसह बसर्गे, हलकर्णी, अरळगुंडी, चंदनकूड, इदरगुच्ची, कडलगे या गावच्या पाणी योजना कार्यान्वित आहेत. नांगनूरसाठी सध्याचे जॅकवेलचे काम सुरू आहे.

लाभक्षेत्रासाठी पंधरा दिवस, तर निलजी बंधाऱ्याखालील गावांना दहा दिवस पाणी उपशास परवानगी आहे. परंतु, दर महिन्याला सोडल्या जाणाऱ्या आवर्तनातील पाणी खणदाळ बंधाऱ्यात सहा दिवसांपर्यंतच टिकते. त्यानंतर मात्र शेतीसाठी तर सोडाच, पिण्यासाठीही पाणी नसते. यामुळे पुढील आवर्तनापर्यंत ग्रामस्थांना पाणीबाणीला सामोरे जावे लागते. परिणामी प्रत्येक महिन्यातील किमान वीस दिवस सात गावांतील हे लोक पाण्याविना असतात. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांनाही पाणी मिळेनासे झाले आहे. 

नागाप्पा घस्ती, दुंडाप्पा गुडशी, नामदेव चिरमुरे, मलाप्पा मुदपाकी, उमेश गोणी, विनायक मगदूम, रमेश पाटील, मल्लिकार्जुन हंचनाळे, रावसाहेब गोटुरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कालवा निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे त्यांनी निवेदन दिले.

निलजीतील पाणी सोडा

गाऱ्हाणे मांडण्यासाठी गुरुवारी (ता. ३) खणदाळ व अरळगुंडीतील ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर धडक मारली. निवेदन देऊन पाण्यासाठी साकडे घातले. उपसाबंदी कालावधीत निलजी बंधाऱ्यातील शिल्लक पाणी किमान पिण्यासाठी तरी खणदाळ बंधाऱ्यापर्यंत सोडावे, अशी त्यांची मागणी आहे. प्रत्येक महिन्याची ही मागणी पावसाळा आला तरी पूर्ण होईनाशी झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com