agriculture news in Marathi, seventy two crore income in kadwanchi in drought condition, aurangabad, maharashtra | Agrowon

दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे उत्पन्न
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जुलै 2019

कडवंची गावाने लोकसहभागातून काटेकोरपणे पाणी नियोजन केले. जमिनीचा मगदूर टिकवून ठेवत बाजारपेठेची मागणी लक्षात घेत शास्त्रीयदृष्ट्या पीकबदल केला. सुधारित तंत्राचा अवलंब करीत शेती उत्पन्न वाढविल्याचे निष्कर्ष कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या कुटुंबनिहाय सर्वेक्षणातून पुढे आले आहेत.  
- प्रा. पंडित वासरे, प्रकल्प अभियंता, कडवंची पाणलोट

जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या कडवंची (जि. जालना) गावाने तीव्र दुष्काळातही आपला शेती उत्पन्नाचा आलेख चढता ठेवला आहे. संपूर्ण गावशिवार हेच पाणलोट क्षेत्र मानून गेल्या तेवीस वर्षांपासून लोकसहभागातून गावकऱ्यांनी जल-मृद्संधारणाचे उपाय करीत पाऊस मुरवला. पारंपरिक पीकपद्धती बदलून द्राक्ष, डाळिंब, पपई, पेरू लागवडीला चालना दिली. दुष्काळी परिस्थितीला टक्कर देत, उपलब्ध पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करीत, कडवंचीतील शेतकऱ्यांनी यंदाही आधीचे विक्रम मोडत शेतीतून ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. या गावचे दरडोई उत्पन्न दोन लाखांवर गेले आहे. 
 

कडवंची हे तसे मराठवाड्यातील एक छोटेसे गाव. आजूबाजूला दुष्काळाने भाजलेल्या अनेक गावांमध्ये वसलेले! गेल्या २३ वर्षांपासून लोकसहभाग, जल-मृद्संधारण आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पीकबदल, नवतंत्रज्ञानाचा वापर करीत दुष्काळी परिस्थितीवरही मात करता येते, हे या गावाने दाखवून दिले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने ‘वॉटर बजेट'' मांडत लागवडी योग्य जमिनीत बाजारपेठेनुसार द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे योग्य पीकव्यवस्थापन करीत आर्थिक प्रगतीची दिशा पकडली.

भूगर्भीय सर्वेक्षण, माथा ते पायथा या सूत्रानुसार पाणलोटाची शास्त्रीय कामे, मृद्संधारणातून जलसंधारण, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात १०० टक्‍के जल-मृद्संधारणाचे उपचार, शेततळ्यातून पाणी नियोजन, पीकपद्धतीत शास्त्रीयदृष्ट्या बदल, १०० टक्‍के ठिबकचा वापर आणि एकमेकांना साथ देत शेतीला नवी दिशा दिली. सलग दुष्काळी परिस्थितीतही कडवंचीमधील अर्थकारणाचा आलेख गेल्या २३ वर्षांत कायम चढता राहिला आहे. २७ ते २९ मे २०१९ यादरम्यान खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी केलेल्या कडवंचीतील 
कुटुंबनिहाय सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

‘वसंतराव नाईक जलसंधारण’ पुरस्काराने गौरव
कृषी विकास व जलसंधारणातील दिशादर्शक कामांची दखल घेऊन कृषिदिनी (ता. १) राज्याच्या कृषिक्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक जलसंधारण’ पुरस्कार देऊन कडवंची गावचा गौरव करण्यात आला. कडवंचीचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर, विठ्ठल क्षीरसागर, विष्णू क्षीरसागर, श्‍याम क्षीरसागर, उत्तमराव क्षीरसागर, विश्वंभर गोल्डे या शेतकऱ्यांसह खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता प्रा. पंडित वासरे यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. कडवंचीमधील लोकसहभागातून जल-मृद्संधारण आणि एकूणच शेती प्रगतीचा चढता आलेख  २१ एप्रिल २०१९ ला ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिन विशेषांकातून सविस्तरपणे मांडला होता. 

दृष्टिक्षेपात कडवंची 
 भौगोलिक क्षेत्र ः१८१८ हेक्‍टर
 कुटुंबसंख्या ः ३५५, लोकसंख्या ः सुमारे ३,३३१ 
 विहिरी ः ३९८, शेततळी ः ५०३

लोकसहभाग, पाणलोटातून बदलले चित्र 

  •  गावात पाणलोटापूर्वी १,३६६ हेक्‍टर क्षेत्र वहितीखाली होते. ते आता १,५१७ हेक्‍टरवर पोचले. गावशिवारातील १४७ हेक्‍टर पडीक क्षेत्र घटून ६२ हेक्‍टरवर आले. बारमाही सिंचन क्षेत्रात २५४ टक्‍के वाढ होऊन ते १७४ वरून ६१७ हेक्‍टरवर पोचले. दुबार सिंचित क्षेत्रात ११० टक्‍के वाढ होऊन हे क्षेत्र ३९८ हेक्‍टरवरून ८९७ हेक्‍टरपर्यंत गेले आहे.
  •  पाणलोटापूर्वी २०६ विहिरी होत्या. आता गावशिवारात ३९८ विहिरी आणि ५०३ शेततळे आहेत. जलसंधारणाच्या कामामुळे पाणीपातळीत ५.९४ मीटरने वाढ झाली. पाणलोटापूर्वी तीन हेक्‍टरवर असलेली द्राक्ष बाग आणि ५७ हेक्‍टर भाजीपाल्याचे क्षेत्र पीकपद्धतीमधील बदलामुळे ६१७ हेक्‍टरवर पोचले. यामध्ये ४८० हेक्‍टर द्राक्ष, २० हेक्‍टर डाळिंब, १२ हेक्‍टर आले, १०५ हेक्‍टर भाजीपाला लागवड.
  •  पाणलोट विकासासाठी १ कोटी २० लाख खर्च झालेल्या कामाव्यतिरिक्‍त कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १२ कोटींची कामे गावशिवारात झाली. यामध्ये ४०० शेततळे, ५०० बायोगॅस संयंत्र, १५ शेडनेट, ५० पॅक हाउसचा समावेश.
  •  विहीर खोदाई, फळबाग लागवड, लहान ट्रॅक्‍टर्स, जनरेटर सेट, शिवार रस्ते आदी कामांमध्ये शेतकऱ्यांचा सुमारे ३५.१७ कोटींची वैयक्तिक गुंतवणूक.

 गावाचे वॉटर बजेट 

  • सरासरीच्या ८५ ते ९० टक्‍के पाऊस झाल्यास ः शेती, पशुपालन आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध.
  • सरासरीच्या ५० ते ६० टक्‍के पाऊस झाल्यास ः  शेततळे भरून ठेवणे, चारापिकाची व्यवस्था, खरीप हंगामात सिंचनाची व्यवस्था, शक्य असेल तरच भाजीपाला लागवड.
  • सरासरीच्या २५ ते ३५ टक्‍के पाऊस झाल्यास ः फक्‍त द्राक्ष बागेसाठी शेततळ्यात संरक्षित पाणी भरून ठेवले जाते. चारापिकाची लागवड

शेती उत्पन्नाचा चढता आलेख
२०१८-१९ मध्ये द्राक्ष व डाळिंबातून उत्पन्न ६६ कोटी, भाजीपाल्यातून दीड कोटी आणि इतर पिकांमधून ४ कोटी ६० लाखांचे उत्पन्न मिळाले. या वर्षीचे कडवंचीचे एकूण शेती उत्पन्न ७२ कोटी १० लाखांवर पोचल्याचे खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. पाणलोटापूर्वी १९९६ मध्ये हे शेती उत्पन्न केवळ ७७ लाख होते. दरडोई ३,२६४ रुपये उत्पन्न हे २ लाख ३ हजारांवर पोचले आहे. याशिवाय, ३२ लाखांपर्यंत निर्माण होणारा रोजगार २०१९ मध्ये आठ कोटींवर पोचला. 

पाच वर्षांतील शेती उत्पन्न (कोटी रुपये)

वर्ष   उत्पन्न
२०१२-१३ २७ 
२०१३-१४  २९ 
२०१४-१५ ३२ 
२०१५-१६  ४२
२०१८-१९ ७२ 

सरासरीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी 

वर्ष  पर्जन्यमान
२०१२-१३   २९
२०१३-१४ ७३
२०१४-१५ ५१
२०१५-१६   ६०
२०१८-१९  ५९

 

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...