‘कडकनाथ’प्रकरणी ७२ शेतकऱ्यांची दीड कोटी रुपयांची फसवणूक 

सागर खोत यांचा कडकनाथच्या दीड कोटीच्या फसवणूक प्रकरणांशी काहीही संबंध नाही. फिर्यादीमध्ये आरोपींच्या यादीत त्यांचे नाव चुकून गेले आहे. फिर्यादी पैसे देताना ते कार्यालयात उपस्थित असल्यामुळे ते या प्रकरणात साक्षीदार आहेत. आमच्याकडून प्रिंटिंगची चूक झाल्याने त्यांचे नाव संशयितांच्या यादीत गेले आहे. - तृप्ती सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक, पाटण.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पाटण, जि. सातारा  ः कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून पाटण तालुक्‍यासह जिल्ह्यातील ७२ शेतकऱ्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इस्लामपूर येथील रयत ॲग्रो इंडिया व महारयत ॲग्रो इंडिया कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे यांच्या विरोधात पाटण पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. सचिन शिर्के (रा. नेरळे, ता. पाटण) यांनी फिर्याद दिली आहे.

सचिन शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की कडकनाथ कोंबडीपालन व्यवसाय करायचा, असे ठरवून कऱ्हाड येथील पांढरा मारुती मंदिराजवळ व दत्त चौकातील रयत ॲग्रो इंडिया कंपनी कार्यालयात गेलो. तेथे विष्णू भैरू मोरे (रा. डोंगळेवाडी) परिचयाचे होते. त्यांना घेऊन गेलो होतो. त्या कार्यालयात योजना सरगडे व रुपेश सावंत होते. त्यांनी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाबाबत माहिती दिली.

२०० पक्ष्यांच्या एका युनिटसाठी ७५ हजार रुपये कंपनीकडे भरल्यानंतर २०० पक्षी, भांडी, लस, औषधे, खाद्य व डॉक्‍टरी उपचार कंपनी पुरविणार असे सांगण्यात आले.  ४० हजार रुपये बुकिंग व करारासाठी भरले, की तत्काळ कोंबडी पालनाचे साहित्य पुरविले जाईल, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर एक ऑक्‍टोबर २०१८ रोजी रयत ॲग्रोच्या इस्लामपूर येथील कार्यालयात गेलो. त्या वेळी कार्यालयात संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे, वसीम इबुसे, दमाने मॅडम व सागर खोत उपस्थित होते. त्या सर्वांकडे पुन्हा चौकशी केली. मी ४० हजार रुपये व विष्णू मोरे यांनी दोन लाख रुपये भरले. त्याबाबत ॲड. व्ही. डी. निलाखे यांच्याकडे भरलेल्या रोख रकमेबाबत नोटरी केली. कंपनीने कराराप्रमाणे २०० पक्ष्यांचे युनिट पुरविले. ते सुरळीत चालू असताना दुसरी दोन युनिट चालू करण्यासाठी माझ्या बॅंक खात्यातून रयत ॲग्रो कंपनीच्या खात्यात ६ एप्रिल २०१९ रोजी ५३ हजार रुपये वर्ग केले. १५ मे रोजी कऱ्हाड कार्यालयात योजना सरगडे यांच्याकडे ८० हजार रुपये जमा केले. मात्र पावती देताना रयत ॲग्रो इंडियाऐवजी महारयत ॲग्रो लिहिलेल्या दिल्या. ती रक्कम ६०० पक्षी व उत्पादित होणारी अंडी यासाठी भरली होती. 

रक्कम भरल्यानंतर कंपनीने पक्षी व अंडी नेली तर नाहीतच. ठरल्याप्रमाणे खाद्य व सेवाही पुरविली नाही. तीन युनिटमधील सत्तर टक्के पक्ष्यांचा मृत्यू झाला. तीस टक्के पक्षी संभाळत आहे. ठरलेल्या कराराप्रमाणे सेवा दिली नाही, त्याबाबत विचारणा करण्यासाठी कंपनीच्या इस्लामपूर येथील कार्यालयात गेलो. त्या वेळी तेथे आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली. कंपनीतून आम्हाला बाहेर काढले. पैसे देतो म्हणून सांगितले. मात्र पुन्हा काही दिवसांनी गेलो असता कार्यालय दहा ते बारा दिवस बंद असल्याने व कोणीही भेटले नाही.

दोन युनिटमध्ये गुंतवणूक केलेल्या दोन लाख ८ हजार ५०० रुपयांची सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे व दोन्ही कंपनींच्या संचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमत करून माझी व इतर ७२ शेतकऱ्यांची एक कोटी ४८ लाख २३ हजार ५१९ रुपयांची फसवणूक केली आहे. सचिन शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलिसांनी सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे व इतरांवर गुन्हा नोंद केला आहे. 

मी घडलेली माहिती पोलिसांना फिर्याद देताना सांगितली आहे. कोणावर गुन्हा दाखल करायचा हा पोलिसांचा प्रश्‍न आहे. मी पैसे देताना सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव कंपनीत उपस्थित होते. त्यांचा त्यात काय संबंध आहे, याची मला कल्पना नाही. पोलिसांनी त्याचा तपास करावा, असे फिर्यादी सचिन शिर्के यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com