मादी वासरांच्या जन्मासाठी सेक्स साॅर्टेड सिमेन फायदेशीर

मादी वासरांच्या जन्मासाठी सेक्स साॅर्टेड सिमेन फायदेशीर
मादी वासरांच्या जन्मासाठी सेक्स साॅर्टेड सिमेन फायदेशीर

पुणे : अमेरिकेत आम्ही सुमारे सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक सेक्स सॉर्टेड सिमेनचा वापर करत हाेतो, त्यातून ९३ टक्के मादी वासरे जन्माला आली आहेत. त्यांचे दूध उत्पादन अणि शारीरिक वाढ चांगली अाहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील सेक्सिंग टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुआन मॉरिनो यांनी मांडले.  

उरळीकांचन येथे बाएफ संस्थेच्या प्रक्षेत्रावर शनिवारी (ता.३) सेक्स सॉर्टेड सिमेन प्रयोगशाळेचे उद्‌घाटन झाले. या वेळी श्री. मॉरिनो बोलत होते. संचालक इयुराडो फर्नांडिस, ग्रीग बीव्हीर, प्रकाश करालीकल, बिल ॲण्ड मिलिंडा गेटस् फाउंडेशनचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी डोनाल्ड नेकरुमा, बाएफचे चेअरमन ऋषीकेश मफतलाल, अध्यक्ष गिरीश सोहोनी, उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे, संस्थेचे विश्वस्त आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, किशोर चौकर, डॉ. नारायण हेगडे, सुनील लालभाई, भरत काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. मॉरिनो म्हणाले, ‘‘बाएफच्या सहकार्याने सुरू झालेल्या या प्रयोगशाळेतून पशूपालकांना दर्जेदार सेक्स सॉर्टेड सिमेन रेतमात्रा उपलब्ध होणार आहे. त्याचा पशुपालकांनी फायदा घ्यावा.’’

श्री. सोहोनी म्हणाले, ‘‘बाएफ सातत्याने पशुपालकापर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहे. पशुपालकांच्या गोठ्यात जातिवंत दुधाळ मादी वासरे जन्माला येण्यासाठी सेक्स सॉर्टेड सिमेन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार आहे. गेली दोन वर्ष सहा राज्यांमध्ये प्रायोगीक तत्त्वावर या रेतमात्रांचा वापर केला असून, त्यातून ९० टक्के मादी वासरे जन्माला आली आहेत.’’

भारत सरकार, बिल मिलिंडा गेट्स फाउंडेशन अणि अमेरिकेतील सेक्सिंग टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या सहकार्याने अद्ययावत सेक्स सॉर्टेड सिमेन रेतमात्रा निर्मिती प्रयोगशाळा उभारली आहे. या प्रयोगशाळेत आता होल्स्टिन फ्रिजीयन, जर्सी, साहिवाल, राठी, रेडसिंधी अणि मुऱ्हा, जाफराबादी म्हशीच्या सेक्स सॉर्टेड सिमेन रेतमात्रा देशभर उपलब्ध करून देत आहोत. येत्या काळात यातून जातिवंत, दुधाळ गाई पशुपालकांच्या गोठ्यात तयार होऊन दुग्धोत्पादनात वाढ होईल, असे श्री. सोहोनी यांनी सांगितले. डॉ. अशोक पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com