सातारा जिल्ह्यात ऊस हंगामावर ‘कोरोना’ची छाया

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. त्याचा परिणाम ऊसगाळप हंगामावरही दिसू लागला आहे.
Shadow of Corona on sugarcane season in Satara district
Shadow of Corona on sugarcane season in Satara district

सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे शिल्लक ऊस लवकर तुटावा, यासाठी कारखान्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. त्याचा परिणाम ऊसगाळप हंगामावरही दिसू लागला आहे. सर्व ऊस तुटणार, की राहणार? याबाबत शेतकऱ्यांत अस्वस्थतता आहे.

जिल्ह्यात ऊस शिल्लक असल्याने १४ कारखान्याकडून गाळप सुरू आहे. १५ मार्चपर्यंत या कारखान्यांकडून ६२ लाख ६८ हजार ५३० मेट्रीक टन ऊस गाळपाद्वारे ७३ लाख ७८ हजार ८२० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. तर, साखरेचा सरासरी ११.७७ टक्के उतारा मिळत आहे. परिपक्व ऊस उपलब्ध होत असल्यामुळे साखर उताऱ्यात सुधारणा झाली आहे. अजूनही जिल्ह्यात ऊस शिल्लक असल्याने सर्व कारखाने सुरू ठेवले आहेत. 

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ऊस तोडणी काहिशी मंदावली आहे. त्यातच सध्या कोरोना संकट घोंगावत आहे. ऊस तोडणी मजूरातही या विषाणूची भिती बसू लागली आहे. आज (ता.२२) जनता कर्फ्यू असल्याने सर्व कारखान्याचे ऊस गाळपही बंद राहणार आहे. मार्च महिन्यात करण्यात येणारी साखर विक्री गर्दीच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूबाबत एका मागोमाग शासन निर्णय घेतले जात आहेत. ऊस हंगामाबाबत काय निर्णय होणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ऊस लवकर तुटला जावा, यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. ऊस तोड मजूरांत या विषाणू बद्दल गैरसमज पसरल्यास ऊस तोडणीच्या कामांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

हार्वेस्टरची संख्या वाढवा

वाढलेली उन्हाची तीव्रता तसेच कोरोनाचा संसर्ग, याचा ऊसतोड मजुरांवर परिणाम होत आहे. परिणामी, ऊसतोडणीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता वाढू लागली आहे. ऊस लवकरात लवकर तुटावा यासाठी साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त हार्वेस्टरचा वापर करणे आवश्यक झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची काळजी दूर होऊन ऊसतोड मजुरांनाही स्वगृही परतण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com