शहाबार बंदर ठरणार आखातातील केळी व्यापाराला पूरक

इराणमधील केळीचा व्यापार तेथे साकारत असलेल्या शहाबार बंदरामुळे वाढणार आहे. ही बाब खानदेश किंवा महाराष्ट्र व इतर राज्यांमधील केळी उत्पादकांसाठी लाभदायीच ठरेल. पाकिस्तान व चीनमधील केळीचा व्यापार सुरू व्हावा यासंबंधी खानदेशातील व्यापारी, शेतकरी, पीक संघांनी पुढाकार घ्यायला हवा. - प्रेमानंद महाजन, महाजन बनाना एक्‍सपोर्ट, तांदलवाडी (जि. जळगाव)
केळी
केळी

जळगाव ः इराणमध्ये भारत सरकारच्या पुढाकाराने साकारण्यात येत असलेले शहाबार बंदर पुढील वर्षी वापरासाठी खुले होण्याचे संकेत असून, या बंदरामुळे आखातातील केळीचा व्यापार सुकर होईल. परिणामी, केळीची निर्यात वाढून दरांवरील दबावाची समस्या फारशी राहणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  भारतीय केळीचे आखातातील देश मोठे खरेदीदार आहेत. इराणला रोज २० ते २२ कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळी हवी असते. तेथे भारतातून रोज फक्त पाच ते सात कंटेनर केळीची पाठवणूक भारतातील महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या भागांतून केली जाते. इराणला केळी पाठविण्यासंबंधी निर्यातदार, खरेदीदारांना दुबईची मदत घ्यावी लागते. प्रथम दुबई येथील अब्बास बंदरावर केळी जाते. मग तेथून केळीची वाहतूक, पाठवणूक पुढे इराण, इराक व इतर देशांमध्ये तेथील खरेदीदार करतात. भारतातून केळी पाठविल्यानंतर इराणमध्ये ती १८ दिवसांत पोचते. इराणमधील बंदराची अडचण व इतर बाबी लक्षात घेता इराणमध्ये शहाबार बंदर साकारले जात असून, त्याचे काम वर्षभरात पूर्ण होईल. पुढील हंगामात या बंदरावर भारतातून थेट केळी पाठविता येईल. यामुळे इराणमध्ये केळी पाठविण्यासंबंधी तीन दिवस कमी लागतील. तसेच इराणमधून जेवढी मागणी येईल, ती पूर्ण करण्यासंबंधीदेखील सकारात्मक स्थिती या बंदरामुळे निर्माण होईल, अशी माहिती मिळाली.  सध्या भारतातून रोज सुमारे २८ कंटनेर केळीची निर्यात आखाती देशांसह इतर भागांत होत आहे. त्यात महाराष्ट्रातील रावेर (जि. जळगाव), अकलूज (जि. सोलापूर) येथून, गुजरातमधील नवसारी व कामरेज ब्रीज भागातून आणि तमिळनाडूमधील थेनी भागातून केळीची निर्यात सुरू आहे. महाराष्ट्रातून रोज १२ कंटनेर, तमिळनाडूमधून १० आणि गुजरातमधून पाच ते सहा कंटेनर केळीची पाठवणूक होत आहे. जळगावात निर्यातीच्या केळीला प्रतिक्विंटल १२५० रुपये दर मिळत आहे. शहादा (जि. नंदुरबार) येथून होणारी केळी निर्यात सध्या बंद असल्याचे सांगण्यात आले.  आवक वाढली मागील वर्षी जूनमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे रावेर, यावल, मुक्ताईनगरमधील अनेक शेतकऱ्यांनी जुलैमध्ये केळीची लागवड केली होती. या केळीची काढणी सध्या वेगात सुरू आहे. या भागात एप्रिलमध्ये केळीची आवक प्रतिदिन २३० ते २५० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) एवढी होती. परंतु सध्या ही आवक वाढून ३५० ट्रकपर्यंत पोचली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही आवक वाढल्याने केळी दरांवर दबाव वाढला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com