सोयाबीन बाजारात हेलकावे

पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. सोमवारी देशभरातील बाजारात सोयाबीन दरात २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा दरात काहीशी घट झाली.
Shake the soybean market
Shake the soybean market

पुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. सोमवारी देशभरातील बाजारात सोयाबीन दरात २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा दरात काहीशी घट झाली. सोयाबीन वायदेही दीड ते दोन टक्क्यांनी घसरले. मात्र बाजारातील फंडामेंटल्स बघता सोयाबीन दरात फारशी घसरण होण्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी सांगितले. 

सोयाबीन बाजारातील चढ-उतार अद्यापही कायम आहेत. बाजारात एखादी चर्चा पसरविल्यास त्याचा परिणाम दरावर होताना दिसतोय. सोमवारी (ता. ६) सोयाबीन दरात सुधारणा झाली होती. शनिवारच्या तुलनेत २०० ते ३०० रुपयाने दर सुधारले होते. तर राज्यातील प्लांट्सचे दर ७ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते. तर बाजार समित्यांतही सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ६०० रुपयांचा दर मिळाला होता. मात्र मंगळवारी प्लांट्सच्या दरात १०० ते ३०० रुपयांची घसरण झाली होती. 

मंगळवारी दुपारपर्यंत सोयाबीनचे प्लांट्सचे दर ६ हजार ९०० रुपयांवर होते. तर बाजार समित्यांत दुपारी ३ वाजेपर्यंत सोयाबीन दर ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे सोयाबीनला सरासरी ६ हजार २०० ते ६ हजार ४०० रुपये दर मिळाला. तर देवास येथे ६ हजार ५०० ते ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. खंडवा येथे ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये दर मिळाला. तर राजस्थानमधील कोटा येथे ५ हजार ६०० ते ६ हजार ६०० रुपये दर मिळाला. बाराण येथे ६ हजार २०० ते ७ हजार ६० रुपये दर मिळाला, असे जाणकारांनी सांगितले. 

वायद्यांतील स्थिती मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सोयाबीनच्या वायद्यांतही दीड ते दोन टक्क्यांनी घट झाली होती. मंगळवारी डिसेंबरचे वायदे ६ हजार ६२१ रुपयांवर बंद झाले. तर जानेवारीचे वायदे ६ हजार ६१६ रुपयांवर झाले. फेब्रुवारीचे वायदेही दीड टक्क्याने घसरून ६ हजार ५९३ रुपयांनी झाले आहे. हजर बाजारातही सोयाबीनचे दर दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाले होते. इंदूर येथील एनसीडीईएक्सच्या केंद्रावर सोयाबीनला ६ हजार ६११ रुपये दर मिळाला. तर  कोटा येथील केंद्रावर ६ हजार ७६७ रुपये दर मिळाला. तर नागपूर येथे ६ हजार ७५४ रुपये आणि अकोला येथील केंद्रावर ६ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

नोव्हेंबरमध्ये चीनची आयात वाढली चीन हा जगातील सर्वांत मोठा सोयाबीन आयातदार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत चीनची सोयाबीन आयात नोव्हेंबर महिन्यात वाढली आहे. शेवटच्या टप्प्यात उत्तर अमेरिकेतून निर्यात वाढली आहे. चीनने नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत तब्बल ६८ टक्के अधिक सोयाबीन आयात केली आहे. ऑक्टोबरमध्ये ५१.१ लाख टन सोयाबीन आयात चीनमध्ये झाली होती. तर नोव्हेंबरमध्ये ८५.७ लाख टन सोयाबीन चीनमध्ये दाखल झाली. सप्टेंबर महिन्यात चक्रीवादळामुळे अमेरिकेतून सोयाबीन निर्यात प्रभावित झाली होती. त्यामुळे चीनमध्ये अमेरिकेऐवजी ब्राझीलमधून सोयाबीन आयात वाढली होती. मात्र ही परिस्थिती निवळल्यानंतर अमेरिकेतून निर्यात सुरळीत होऊन सोयाबीनची निर्यातही वाढली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत यंदा अमेरिकेतून चीनला होणारी सोयाबीन निर्यात घटण्याची शक्यता आहे. तसेच ब्राझीलमधील सोयाबीन काहीसे स्वस्त मिळत आहे. चीनची नोव्हेंबरमधील सोयाबीन आयात ८५.७ लाख टनांवर पोचली असली तरी, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ९५.९ लाख टन आयात झाली होती. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यांच्या काळात चीनने ८७६.५ लाख टन सोयाबीन आयात झालीये. ही आयात मागील वर्षीच्या तुलनेत साडेपाच टक्क्यांनी कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com