शेतकऱ्यांना पुनर्लागवडीसाठी ऊस बियाणे देणार : पवार यांचा दिलासा

शिरोळ, जि. कोल्हापूर : येथील पूरग्रस्तांशी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी (ता. १४) संवाद साधला.
शिरोळ, जि. कोल्हापूर : येथील पूरग्रस्तांशी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी (ता. १४) संवाद साधला.

शिरोळ, जि. कोल्हापूर : महापुराने घरांबरोबरच उसासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी मदत म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने ऊस बियाणे कारखान्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात येईल. यातून किमान ऊस पुनर्लागवडीचा खर्च निघू शकेल, असा दिलासा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिला.  श्री. पवार यांनी बुधवारी (ता. १४) दिवसभर तालुक्‍यातील विविध गावांना, पूरग्रस्त तात्पुरते राहात असलेल्या शाळांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी ते बोलत होते. ज्या प्रमाणे लातूर जिल्ह्यात भूकंपप्रवण क्षेत्रात कायमस्वरूपी मजबूत घरे बांधण्यात आली असेच काम पूरग्रस्त भागातही अपेक्षित आहे. यासाठी लवकरच राज्य सरकारची भेट घेऊन या मागण्यांसाठी आग्रही राहणार असल्याचे मत श्री. पवार यांनी व्यक्त केले.  ते म्हणाले, ‘‘लोकांना पुरामुळे घरे सोडावी लागली, आयुष्यभर उभा केलेला संसार सोडावा लागला, हे खूप मोठे दु:ख आहे. राज्य सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. २०१९ची पाण्याची पातळी पाहून कायमची उपाययोजना केली पाहिजे. घरे पडली आहेत. पुढच्या काही दिवसात आणखी पडझड होणार आहे. त्यांना नवीन घरे बांधून दिली पाहिजेत. हे काम अशक्‍य नाही. आम्ही लातूरला हे काम करून दाखविले. आता भूकंप होतो. पण एकही घर पडले नाही. अशाच पद्धतीचे काम करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी गावातील काही वस्ती हलवावी लागेल. प्राधान्यक्रमाने हे काम केले पाहिजे. यासाठी पुरेसा आर्थिक निधी पोचायला हवा.’’  श्री. पवार म्हणाले, ‘‘ऊस, सोयाबीन, भुईमुगाचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील मुख्य पीक असणारे उसाचे पीक सध्याच्या परिस्थितीत टिकणे अवघड आहे. हे नुकसान गृहीत धरून बॅंका, सोसायटीच्या कर्जांना राज्य सरकारने माफी दिली पाहिजे. सगळंच गेलंय तर कर्ज कुठून फेडणार हा प्रश्‍न आहे. आम्ही बियाणे पुरवून शेतकऱ्याचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. काही हजार एकरांवरील बियाणे तयार ठेवले आहे. इफको या सहकारी खत संस्थेची संपर्क साधून आम्ही कंपनीने एक तरी मोफत किंवा सवलतीच्या दरात खत पुरवठा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शेतमजुरांनाही रोजगार हमी योजनेसारख्या योजनांमधून आर्थिक मदत करावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत गावांची पुनर्बांधणी ही सध्या अग्रस्थानी असणे गरजेचे असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. आमदार हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर, उल्हास पाटील, गणपतराव पाटील, अमरसिंह पाटील आदी यावेळी उपस्थित होते.  ठोस उपाययोजना करा ः पूरग्रस्तांची मागणी  श्री. पवार यांनी पूरग्रस्तांशी थेट संवाद साधून परिस्थितीची माहिती करून घेतली. पूरग्रस्तांनी घरे, शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. माहिती देताना अनेक महिलांचे अश्रू ओघळू लागले. साहेब, आमची घरे गेली, उद्या कुठे जाणार? काहीच उरले नाही, काही तरी करा, अशी साद पूरग्रस्त महिलांनी श्री. पवार यांना घातली. काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला पुन्हा उभे करू, असा दिलासा श्री. पवार यांनी या वेळी पूरग्रस्तांना दिला. जैनापूर, अर्जुनवाड, घालवाड, पद्माराजे विद्यालय, दत्त साखर कारखाना, दानोळी, कवठेसार, नरंदे येथील पूरग्रस्तांशी संवाद साधत या भागाची पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com