महाराष्ट्र एकजुटीने संकटावर मात करेल : शरद पवार

 महाराष्ट्र एकजुटीने संकटावर मात करेल : शरद पवार
महाराष्ट्र एकजुटीने संकटावर मात करेल : शरद पवार

कऱ्हाड, जि. सातारा   ः तुमच्यात एकी ठेवा. संकटावर आपण सगळे मिळून मात करू आणि जगाला दाखवून देऊ की संकट येतं; परंतु महाराष्ट्रातील मराठी माणूस त्या संकटावर एकजुटीने मात करतो, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त जनतेच्या मनात निर्माण केला.

तांबवे या पूरग्रस्त गावास शनिवारी श्री. पवार यांनी भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार आदी यावेळी उपस्थित होते. 

पश्चिम महाराष्ट्रातील कऱ्हाड-पाटण तालुक्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने मोठे नुकसान झाले आहे. या संकटाचा मुकाबला करणे एकट्याचे काम नाही. त्यासाठी सर्वांनीच मदत करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व खासदार, आमदार पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देतील, अशी घोषणा श्री. पवार यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रात उसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ पाठवून जास्तीत जास्त ऊस पीक कसा वाचवता येईल याचा अभ्यास करून त्यावरील उपाय सुचवण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

श्री. पवार म्हणाले, की पुरामुळे राज्यातील अनेक गावांवर मोठे संकट आले आहे. रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक घरांत पाणी असल्याने नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले. शेती उद्ध्वस्त झाली आहे. उसाच्या शेंड्याच्या वर चार फूट पाणी असेल तर तो ऊस पिकत नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा मी अध्यक्ष असून तेथील ऊस तज्ज्ञांना कारखान्यांच्या मदतीने ऊस पिकाच्या पाहणीसाठी पाठवणार आहे. उसाचे पीक कसे वाचवता येईल यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

तांबवे गावात ३७५ कुटुंबे बाधित असून १ हजार ८७५ लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. संकट मोठे असेल तर त्याला तोंड देण्याची ताकद एकट्याची नसते. त्यासाठी राज्य, केंद्र सरकार, दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीसाठी पुढे यायला पाहिजे. कुठेही संकट आले की महाराष्ट्र मदत करतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संकटासाठी देशाने मदत करावी. मदत करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही बारामती अॅग्रो ट्रस्टच्या माध्यमातून एक ट्रक साहित्य आणले आहे. सर्वात गरीब आहे त्यांना मदत करा. शासकीय मदत कशी देता येईल याचा आम्ही पाठपुरावा करू, असे श्री. पवार यांनी सांगितले.   डोंबे बंधूंच्या दातृत्वाचे कौतुक  अजूनही समाजात माणुसकी असून संकटग्रस्तांना मदत करायची भावना आहे. त्यामुळे लोक मदत करतात. शुक्रवारी बारामतीत एक कोटी रुपये जमले. शनिवारी तांबवे येथील कमल तुकाराम डोंबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त राजाराम तुकाराम डोंबे, रमेश तुकाराम डोंबे यांनी जेवणाचा खर्च न करता १० हजार रुपयांची रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे. ही माणुसकी आणि मोठेपणा समाजात आहे. त्यामुळे संकटावर मात करण्याची ताकद सामान्यांमध्ये आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com