हमीभाव या मुद्द्याशिवाय इतर कोणतेही तत्त्वज्ञान व्यर्थ

हमीभाव या मुद्द्याशिवाय इतर कोणतेही तत्त्वज्ञान व्यर्थ
हमीभाव या मुद्द्याशिवाय इतर कोणतेही तत्त्वज्ञान व्यर्थ

जळगाव : शेतीमालाचे दर किंचितही वाढले तरी दिल्लीत महागाईचा मुद्दा उचलला जातो. दर कमी करायची मागणी केली जाते. शेतीमालाचे दर वाढले तर महागाई वाढते, ही दिल्लीमधील मंडळीची विचारधारा व मानसिकता बदलली पाहिजे. शेती व शेतकरी यांच्या प्रश्‍नांची जाणीव दिल्लीकरांना व्हावी. शेतीमालास खर्चावर आधारित दर मिळालेच पाहिजेत. हमीभाव या मुद्द्याशिवाय इतर कोणतेही तत्त्वज्ञान व्यर्थ आहे. अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारवर शुक्रवारी (ता. ३०) येथील जैन हिल्सवर आयोजित कार्यक्रमात केली. जैन इरिगेशनतर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वडनेर भैरव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील अविनाश मनोहर पाटोळे यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेश जैन, एकनाथ खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, खासदार रक्षा खडसे, आमदार डॉ. सतीश पाटील, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, कविवर्य ना. धों. महानोर, दलिचंद जैन आदी होते. जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सुरवातीला जैन इरिगेशनची शेती विकासाची भूमिका व उपक्रम याची माहिती दिली.  श्री. पवार म्हणाले, की शेतकरी कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या समस्येने संकटात आला. पंजाब, हरियानात गव्हावर तांबेरा रोग आहे. या रोगराईवर उपाय शोधले पाहिजेत. मराठवाडा, खानदेशातील शेतकरी अडचणीत आहे. केळी पिकावरही रोग आले आहेत. पण तंत्रज्ञान, नवे वाण हवे आहे. संशोधन व्हायला हवे. शेतकऱ्यांवर माझा प्रचंड विश्‍वास आहे. दिल्लीमधल्या मंडळीला नेहमी स्वस्तात शेतीमाल हवा आहे. कांद्याचे दर वाढले की सारखा गोंधळ तेथे होते. पण मी कांदा उत्पादकांचे मुद्दे दिल्लीत मांडले. कांदा दैनंदिन गरजेचा आहे, पण तो किती स्वस्त आहे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न संसदेत केला. परंतु मला दिल्लीत एका सत्ताधाऱ्याने तुम्ही नेहमी उत्पादन घेणाऱ्यांची बाजू मांडतात, जे खातात, त्यांचे काय होईल, याचा विचार करीत नाही. त्यावर मी संबंधित मंत्र्याला सांगितले, की जर उत्पादन घेणाराच उद्‌ध्वस्त झाला तर खाणारे काय खातील. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार केलाच पाहिजे. अन्यथा परदेशी मालावरील अवलंबित्व वाढेल. शेतीमालास खर्चावर आधारित दर मिळालेच पाहिजेत. हमीभाव या मुद्द्याशिवाय इतर कोणतेही तत्त्वज्ञान व्यर्थ आहे. शेतीच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. राज्यकर्त्यांनी हमीभावाची काळजी घेतली पाहिजे. 

चांदवडसारख्या दुष्काळी भागातील अविनाश पाटोळे यांनी शेतीत चांगले काम केले. त्यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे. जळगावात आल्यावर जैन हिल्सवर यायचो. भवरलाल जैन यांच्याशी सुसंवाद व्हायचा. शेती, शिक्षण हे चर्चेचे मुद्दे असायचे. भवरलाल जैन हे फणसासारखे होते. त्यांच्या मनात ओलावा व गोडवा होता. आता ते आपल्यात नसल्याचे दुःख असल्याचेही पवार म्हणाले. 

भाजपच्या मंत्र्यांची पवार यांच्यावर स्तुतिसुमने या कार्यक्रमात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, शरद पवार हे लोकनेते आहेत. अप्पासाहेब पवार यांनी शेतीला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्याशी माझे बोलणे व्हायचे. जैन इरिगेशनसारख्या कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी करार शेतीमध्ये येऊन सरकारसोबत काम करावे, असे प्रस्ताव फुंडकर यांनी ठेवला. तर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, की शरद पवार हे लोकनेते आहेत. शेतकऱ्यांचे ते ब्रॅंड अॅम्बेसीडर असून, त्यांचे मोठे योगदान शेतीसाठी असल्याचेही लोणीकर म्हणाले. तसेच शेतीमालाबाबत आपल्याला आलेल्या अनुभवांबाबत लोणीकर म्हणाले, मी स्वतः पपईची शेती केली. माझ्या पपईला व्यापाऱ्यांनी दीड ते दोन रुपये प्रतिकिलो दर दिला. त्याच पपईची या व्यापाऱ्यांनी १२ रुपये प्रतिकिलोने विक्री केली. शेतकऱ्याला दर मिळत नाहीत, ही समस्या आहे, परंतु यात प्रक्रिया उद्योगांवर भर द्यायला हवा. राज्य सरकार शेतकऱ्यांची पहिलीच औद्योगिक वसाहत सुरू करणार असून, त्यासाठी जालन्यात जमीनही खरेदी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतीच्या उद्योगांवर काम सुरू आहे. पूर्वी अभ्यासात जे मागे असायचे ते शेती करायचे, परंतु अलीकडे शेतीमध्ये हुशार, अभ्यासू मुलांची गरज आहे. कमी शिकलेले शासकीय नोकरीतही चालतात, असेही लोणीकर गमतीने म्हणाले. 

वडनेर भैरव येथील अविनाश पाटोळे व त्यांची पत्नी रश्‍मी पाटोळे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव झाला. सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी प्रा. चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, उन्मेष पाटील, शिरीष चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्ज्वला पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. गुणवंत सरोदे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com