काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचेच सरकार येणार : शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार

कऱ्हाड, जि. सातारा   ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्या वेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचेच सरकार येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

कऱ्हाड येथे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी सोमवारी (ता. २५) अभिवादनासाठी श्री. पवार आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील या वेळी उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोमवारी पदाची सूत्रे स्वीकारणार त्यावर श्री. पवार म्हणाले, की शपथ घेतल्यानंतर सूत्रं ही स्वीकारायची असतात. मात्र ही निवड वैध आहे की नाही, हा प्रश्न सर्वेच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र, घटनेनुसार त्याला पाठिंबा लागतो तो पुरेसा आहे की नाही हे ३० तारखेपूर्वी बहुमत स्पष्ट करायचे असल्याने नजरेसमोर येईल.

भाजपला बहुमत नव्हते म्हणून त्यांनी सरकार स्थापन केले नाही. त्यांनी राज्यपालांकडे सुरुवातीला जाऊन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही सरकार बनवू शकत नाही असे लेखी दिले आणि आता त्यांनी सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केलेला असावा असे दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका सुरू आहेत. व्यक्तिगत दोन-तीन लोक गेले असतील. मात्र, पक्षाचा पाठिंबा त्यांना नाही. त्यामुळे पक्ष म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी नाही, असे श्री. पवार यांनी सांगितले.   ‘अजित पवार यांच्यामागे माझा हात नाही’ अजित पवार यांचे बंड हा पक्षाचा निर्णय नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. अजित पवार यांनी जे केले त्या पाठीमागे माझा हात असता तर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगितले असते. माझ्या सहकाऱ्यांशी एखाद्या प्रश्नावर चर्चा करून ते त्यांना पटवून दिले तर ते माझ्या सूचनेचा अनादर करतात, असा माझा अनुभव नाही. त्यामुळे त्यापाठीमागे माझा हात आहे, असे म्हणणे बरोबर नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी येथे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com