भूकंपग्रस्तांच्या आशीर्वादातून मिळाली ऊर्जा ः शरद पवार

उमरगा येथे कृतज्ञता सोहळा
उमरगा येथे कृतज्ञता सोहळा

उमरगा, जि. उस्मानाबाद  : लातूर - उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या महाप्रलंयकारी भूकंपानंतर निर्माण झालेली विदारक परिस्थिती योग्य नियोजनाने हाताळली. वित्तहानी, मनुष्यहानीच्या भयावह स्थितीचा सामना करण्याचे धैर्य भूकंपग्रस्तांना दिले. त्यांनीही आता रडायचे नाही, उभे रहायचे अशी खूणगाठ बांधून संकटातून बाहेर येत नव्याने संसार उभारला, याचे आत्मिक समाधान वाटते, असे प्रतिपादन तत्कालीन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. माझ्यावर जेव्हा कॅन्सर या आजाराचे संकट आले होते, त्या वेळी भूकंपग्रस्तांच्या आशीर्वादातून ऊर्जा, प्रेरणा मिळाली, असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

येथील भूकंपाच्या घटनेला २५ वर्षे झाली. त्यापार्श्वभूमीवर भूकंपग्रस्त कृतज्ञता समितीच्यावतीने रविवारी (ता. ३०) बलसूर (ता. उमरगा) येथे शरद पवार यांचा भूकंपग्रस्त भागातील तत्कालीन सरपंचांच्यावतीने ऋणनिर्देश सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्या वेळी श्री. पवार बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री  शिवराज पाटील-चाकूरकर, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, राणा जगजितसिंह पाटील, अमित देशमुख, राहुल मोटे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, भूकंपग्रस्त कृतज्ञता समितीचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, सुनील माने उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की भूकंपानंतरची स्थिती थरकाप उडविणारी होती. सकाळी सात वाजता लातूरला पोचलो. तेथून किल्लारीसह अन्य गावांची पाहणी केली. तातडीने लष्कर, पोलिस व विविध शासकीय यंत्रणांना सूचना केल्या. पहिल्यांदा जखमींना बाहेर काढून त्यांना उपचाराची यंत्रणा सुरू केली. अन्न- पाण्याची सुविधा करण्याच्या सूचना केल्या. तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. जमीन पडीक ठेवायची नाही असे सांगत बियाणे उपलब्ध करून दिले आणि पेरणीच्या कामासाठी धैर्य दिले. आज हजारो शेतकऱ्यांनी शेतजमीन फुलविली याचे समाधान वाटते.

लातूर- उस्मानाबादच्या भूकंपानंतर साठ गावांचे झालेले आदर्श पुनर्वसन व त्या वेळी हाताळलेल्या परिस्थितीने भूकंपग्रस्तांना मिळालेली नवी उभारी, हा जगासाठी आदर्श ठरला. आपत्ती व्यवस्थापनाचा नवा कायदा केंद्रात केला गेला. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील- चाकूरकर यांनी मोठे सहकार्य केले. माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनीही मोठी जबाबदारी उचलली, असे श्री. पवार यांनी सांगितले.

सकाळ रिलीफ फंडाच्या कार्याविषयी कृतज्ञता सकाळ रिलीफ फंडाने मराठवाड्यातील भूकंपावेळी झुणका- भाकर केंद्र चालविण्यापासून ते वैद्यकीय मदत आणि शाळांच्या उभारणीपर्यंत कार्य केले. या समाजसेवेसाठी सन्मानपत्र देऊन सकाळ रिलीफ फंडाच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी शरद पवार यांच्या हस्ते याविषयीचे स्मृतिपत्र स्वीकारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com