सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्येच : शरद पवार

सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्येच ः शरद पवार
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्येच ः शरद पवार

मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या माणसांच्या हातात आहे. भाजप सरकारला शेती, शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. शेतकरी, मजुरांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. परिणामी शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यामुळे आता विचार करायची वेळ आली असून सर्व विरोधक एकसंध राहिले तर देशातील चित्र बदलू शकते, सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.  जो जो भाजपच्या पर्यायाने जातीयवादाच्या विरुद्ध आहे, त्या सगळ्यांनी राष्ट्रीय आपत्ती म्हणून एकत्र यायला हवे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन या जातीयवादी प्रवृत्तींना सत्तेतून हुसकावून लावण्याचे काम झाले पाहिजे. विचाराने सोबत राहून महाराष्ट्रात पेटलेला हा वणवा देशभर नेऊया, असे आवाहन श्री. पवार यांनी या वेळी केले.  अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने सोमवारी (ता.१२) आयोजित शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव माजी खासदार हन्नन मोल्ला, डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित आदी उपस्थित होते.  या वेळी शरद पवार म्हणाले की, सध्या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या डोक्यावरच कर्ज वाढतंय. शेती उत्पादन घटतंय. देशासमोर शेती उत्पादने आयात करण्यासारखे संकट उभे आहे. याचा परिणाम देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांवर होत आहे. देशात  ६२ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यापैकी ८१ टक्के शेतकऱ्यांकडील क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यापैकी ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. 

राज्यातला शेतकरी पिण्याचे पाणी, हाताला काम, जनावरांचा चारा या संकटात सापडला आहे. संकटे येतात, राज्याला दुष्काळ नवा नाही. यापूर्वी १९७२, ७८ तसेच मधल्याकाळातही दुष्काळी स्थिती होती. राज्याने अनेकदा अशा संकटाला तोंड दिले आहे. मात्र, सध्याच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांबद्दल काडीचीही आस्था नाही. राज्यात शेतकरी, शेतमजुरांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे स्थलांतर होत आहे. पोटाची आग विझवण्यासाठी दुष्काळग्रस्त मुंबईची वाट धरीत आहेत. शासन कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. निसर्गाचा लहरीपणा, कर्ज, बि-बियाणे, खते देऊनही पाऊस पडला नाही तर दोष शेतकऱ्याचा नसतो. राज्यकर्त्यांनी याचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा. 

‘‘गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या माणसांच्या हातात गेला आहे. भाजप सरकारला शेती, शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. शेतीमालाची निर्यात २२ टक्क्यांनी घटली आहे. त्याउलट आयात ६५ टक्क्यांची वाढवली आहे. दुष्काळाचे संकट असताना चर्चा मात्र मंदिराची सुरू आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नसल्याने लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे. अशा काळात सर्वांना जागरूक राहण्याची गरज आहे. सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करू. प्रसंगी रस्त्यावर उतरून या जातीयवादी प्रवृत्तींना सत्तेतून हुसकावून लावण्याचे काम झाले पाहिजे. विचाराने सोबत राहून महाराष्ट्रात पेटलेला हा वणवा देशभर नेऊया, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. 

माजी खासदार हन्नन मोल्ला म्हणाले, मोदी सरकार देशभरात शेतकऱ्यांकडून जमिनी हिसकावून घेण्याचे काम करीत आहे. मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. गेल्या ७० वर्षांत मोदींसारखा शेतकरी विरोधी पंतप्रधान झाला नाही. शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे, अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २९, ३० नोव्हेंरबला नवी दिल्लीत लाँग मार्च काढत आहोत. येत्या निवडणुकीत शेतकरी हाच प्रचाराचा मुद्दा असणार आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांच्याविरुद्ध सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे. ही परिषद राज्याच्या आगामी राजकारणाचे भवितव्य ठरवणारी आहे. राज्याचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. सरकार फसव्या घोषणा करते. उद्योग, विकासात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता शेतकरी आत्महत्येत आघाडीवर गेला आहे. सरकारला असंवेदनशील आहे. शासनाला शेती कळत नाही किंवा राजकीय इच्छाशक्ती नाही. 

विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शासनाचा चार वर्षातला कारभार मुका, आंधळा आणि बधिरासारखा आहे. भाजपला दिलेली संधी संपली आहे. आता आपल्या हातात संधी आहे. २०१९ ला भाजपला सत्तेतून खाली खेचा. शासनाच्या निर्णयावरूनही त्यांनी या वेळी टीका केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, मोदींनी देशातील शेतकऱ्यांना दिलेल्या कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. येत्या काळात खोट्या आश्वासनांचा पाऊस पडेल. त्याविरोधात एकसंध ताकद उभी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची शक्तीच भाजपचा पराभव करू शकते. कॉम्रेड नरसय्या आडम, शेकापचे जयंत पाटील, उल्का महाजन आदींची भाषणे झाली. परिषदेत शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित बारा ठराव करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com