शेतकरी वर्गाची गरज भागविण्यासाठी फळशेतीला प्रोत्साहन द्या : शरद पवार

शरद पवार
शरद पवार

पुणे : “अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी देशाला कष्टपूर्वक साथ दिली. मात्र आता शेतकरी वर्गाची गरज भागविण्यासाठी फळशेतीला प्रोत्साहन आणि गती देण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.   महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या तीनदिवसीय अधिवेशनास बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे शनिवारी (ता. ३) प्रारंभ झाला. या वेळी अध्यक्षपदावरून श्री. पवार बोलत होते. या वेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक त्रिलोचन महापात्रा, उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग (विस्तार), उपमहासंचालक डॉ. टी. जानकीराम (उद्यानविद्या), कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. इंदू सावंत, अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, बागाईतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजी पवार, खजिनदार कैलास भोसले, मध्यवर्ती विज्ञान समितीचे प्रमुख अरविंद कांचन व्यासपीठावर होते.  श्री. पवार म्हणाले, ‘‘एके काळी देशात अन्नधान्याची टंचाई होती. शेतकऱ्यांनीच अन्नधान्याची पूर्तता केली. जगालाही आपण अन्नधान्य निर्यात करीत आहोत. मात्र शेतकऱ्यांची गरज भागविण्यासाठी आता फळशेतीला गती द्यावी लागेल. कारण शेतकऱ्याला समृद्ध करण्याची क्षमता फलोत्पादनात आहे.’’ शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नातून आंबा, संत्रा, डाळिंब, केळीसाठी तसेच इतर फळपिकांसाठी विविध संस्था स्थापन केल्या. द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करताना शरद पवार (video) मात्र शास्त्रशुद्ध व सातत्यपूर्ण काम बघण्यासाठी महाराष्ट्राच्या द्राक्ष संघाकडेच पाहावे लागते. जगातील नावीन्यपूर्ण बदलाची नोंद घेऊन द्राक्षशेतीत सतत नवे प्रयोग करण्याचे काम संघ करतो आहे. मात्र संघाने आता बेदाणा निर्यात तसेच मार्केटिंगवर भर द्यावा. काढणीच्या हंगामात प्रदर्शन भरावावे. त्यात खरेदी-विक्रीचे करार-मदार करावेत,” अशी मौलिक सूचना श्री. पवार यांनी केली.  श्री. पवार यांनी बागाईतदार संघाची स्थापनेविषयक आठवणींना उजाळा दिला. “१९६० मध्ये संघाच्या स्थापनेत पुढाकार घेतलेल्या नानासाहेब शेंबेकर यांच्या पहिल्या बैठकीला मी प्रेक्षक म्हणून गेलो होतो. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत संघाचे एकही अधिवेशन मी चुकविलेले नाही. संघात आता नवी पिढी आली आहे. राजेंद्र पवार यांनी संघाचे काम हाती घेतल्याचा आनंद आहे. ते एक वेगळी दिशा संघाला देतील. बदलते तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी संघात वैविध्यपूर्ण कामे करणारी पिढी पाहून समाधान वाटते,” असे श्री. पवार म्हणाले. 

नव्या बाजारपेठा शोधाव्या लागतील “ऊस व साखर उत्पादनात महाराष्ट्र दोन नंबरवर आहे. मात्र, साखरेच्या मार्केटिंगसाठी राज्याला अडचणी येतात. सुदैवाने द्राक्षात तशी समस्या नाही. पण वाढत्या उत्पादनासाठी विदेशी बाजारात उतरल्याशिवाय गत्यंतर नाही. संघ त्यासाठी प्रयत्न करतोय ही आनंदाची बाब आहे. द्राक्ष निर्यात आता सव्वादोन लाख टनांच्या पुढे गेली आहे. या निर्यातीत राज्याचा वाटा त्यात ९८ टक्के आहे. शेतकऱ्यांनी बदल स्वीकारून कष्ट व धडपड केल्यामुळे हा बदल झाला आहे. मात्र चीन, आग्नेय आशियाच्या बाजारपेठा शोधाव्या लागतील,” असे श्री. पवार म्हणाले.  

द्राक्षशेतीला मत्सशेतीची जोड द्या : डॉ. सावंत कुलगुरू डॉ. सावंत म्हणाले की, “द्राक्षशेतीला आता मत्सशेतीची जोड दिली पाहिजे. कारण, एक कोटी लिटर्स पाण्याच्या तळ्यासाठी येणारा खर्च मत्सशेतीतून एका वर्षात वसुल करता येईल. झिरोबजेट शेतीत जिवामृत जे काम करते तेच परिणाम मत्सशेतीच्या पाणी वापरातून होतात. मासे वाढविलेले पाणी सिंचनासाठी वापर केल्यास भूसुधार होतोच पण रोगनियंत्रणदेखील मिळते.” 

संघ चालविण्यासाठी निधी लागेल ः पवार  संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले, की नवे तंत्रज्ञान, वाण, सल्ला देणारा संघ विविध समस्या सोडविण्याचे ताकदवान व्यासपीठ बनले आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना महाग्रेपची स्थापना झाल्याने शेतकरी निर्यातक्षम बनले. मात्र भविष्यात संघ चालविण्यासाठी निधी उभारावा लागेल. खासगी संस्थांकडून निधी, सरकारी अनुदानातून संघाला सक्षम करावे लागेल. जीए आयात व द्राक्ष लागवडीशी संबंधित उत्पादनाबाबत नोंदणीच्या समस्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने सोडवाव्यात. पवार साहेबांचा सल्ला, आशीर्वाद घेऊन जातोय : डॉ. महापात्रा भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी श्री. पवार यांची तोंडभरून स्तुती केली. ते म्हणाले, की देशाचे कृषिमंत्री म्हणून भारताच्या शेतीविषयक धोरणाला नवी दिशा दिली. त्यांची दूरदृष्टी कृषी क्षेत्राच्या भरभराटीला कारणीभूत ठरते. श्री. पवार यांची द्राक्ष बागाईतदार संघाच्या अधिवेशनातील उपस्थिती प्रोत्साहन देणारी असते. श्री.पवार यांच्याकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही आभार मानतो. या अधिवेशनातील त्यांचा सल्ला व आशीर्वाद घेऊन आम्ही जाऊ. त्यानुसार देशाच्या कृषी व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न आम्ही करू. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आव्हानात्मक ः डॉ. महापात्रा महासंचालक डॉ. महापात्रा म्हणाले, “शेतकरी उत्पन्न दुप्पट करण्याचे सध्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ते आव्हानात्मक आहे. मात्र अवघड नाही. त्यासाठी ‘आयसीएआर’ने प्रत्येक जिल्ह्यात दोन गावे निवडून प्रयोग सुरू केले आहेत. जलवायू परिवर्तन, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनाबरोरच तर आता संपूर्ण शेतीच एकात्मिक पद्धतीने करावी लागेल. त्याला प्रक्रिया व बाजारपेठीची जोड द्यावी लागेल.” युवा शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगात आणून रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये २५ केंद्रे तयार केली गेली आहेत. देशात अशी ५० केंद्रे बनविली जातील. तसेच १२५ स्टार्ट्‌सअप केंद्रे सुरू केली जातील. जल वायू परिवर्तनात तगून राहणारी शेती साकारण्यासाठी १५१ समूह तयार करू, असेही डॉ. महापात्रा म्हणाले. शरद पवार यांनी दिल्या मौल्यवान टिप्स

  • द्राक्ष निर्यातीसाठी आग्नेय आशिया, चीन, आखातात बाजार शोधा
  • द्राक्ष शेतीतील समस्यांचे नीट संकलन करा. मी दिल्लीत बैठकीचे आयोजन करतो.
  • सध्याची ५० हजार टनांची बेदाणा निर्यात वाढवा 
  • उत्तम तंत्रज्ञान व वाण आणण्याचा प्रयत्न करा
  • पाणी व फवारणी व्यवस्थापनात जादा लक्ष द्या 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com