दुष्काळप्रश्नी ठोस निर्णय घ्या, अन्यथा शेतकऱ्यांचा हिसका दाखवूः शरद पवार

दुष्काळी परिषद
दुष्काळी परिषद

सांगोला, जि. सोलापूर : दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर नाही, केवळ फसव्या घोषणा सुरू आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढलेली असताना राज्यात एकही चारा छावणी अजून सुरू नाही, किती ही असंवेदनशीलता, असा सवाल करत लबाडाघरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं म्हणतात, ते असं, अशा शब्दांत प्रहार करताना दुष्काळावर ठोस निर्णय घ्या, अन्यथा शेतकऱ्यांचा हिसका दाखवू, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी सरकारला दिला. यासंबंधी लवकरच मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देऊन मुदत देऊ, असेही ते म्हणाले.  सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या वतीने आयोजित दुष्काळी परिषदेमध्ये श्री. पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार भारत भालके, बबनराव शिंदे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, माजी आमदार दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.  श्री. पवार म्हणाले, ''''दुष्काळासारख्या विषयावर सरकारने गंभीर होऊन तातडीने निर्णय घेतले पाहिजेत. आज महाराष्ट्र दुष्काळाने काळवंडला आहे. पण अजून जीआर निघतायेतच, जळालेल्या बागांनाही त्या वेळी आम्ही मदत केली, तसेच तातडीने चारा छावणी, पाण्याची सोय केली, दीड वर्षे छावण्या सुरू होत्या, त्याही वेळेत आणि मोफत. एकट्या सांगोल्यात त्या वेळी एक लाख जनावरे होती. पण आज छावणीसाठी जीआर निघाला, तर त्यात नियम, अटींचा गोंधळ घातला आहे. त्यात प्रति जनावरामागे ४० रुपये तगाई घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अरे तगाई कशासाठी घेतली जाते, हे तरी लक्षात घ्या, आज कर्जमाफीचं काय झालं हे सर्वांना माहिती आहे. अजूनही स्पष्ट आकडे सांगितले जात नाहीत, पीक विमा कंपन्या नुसत्या पोसण्यासाठी ठेवल्यात, शेतकरी आत्महत्यांचा विषय संवेदनशीलपणे समजून घेऊन, एका रात्रीत ७२ हजार कोटींची सरसकट कर्जमाफी फक्त आम्ही दिली आणि ती आम्हीच देऊ     शकतो.''  ''गेल्या वर्षी शेतकऱ्यांचा हजारोंचा लाँगमार्च मुंबईला निघाला, पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आश्वासनाशिवाय काय मिळाले, आज पुन्हा लाँगमार्च निघतोय, पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुली जिवावर उदार होऊन आंदोलन करत आहेत, चाललंय काय? असेही पवार म्हणाले.  प्रा. एन. डी. पाटील यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री दोघांनाही आरडाओरडा करून बोलण्यापलीकडे काही जमत नाही, लोकांनी फक्त यांची भाषणे ऐकावीत, असं यांना वाटतंय, पण आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे सांगितले.  ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनी, दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. यंदाची  परिस्थिती वाईट आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ५० हजार रुपये आणि फळबागेसाठी एक लाख मिळायला हवेत, अशी मागणी केली. या वेळी जयंत पाटील यांनीही सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे यांचेही भाषण झाले.  शेतकऱ्यांना भीक नकोय  शेतकऱ्यांना प्रतिवर्षाला सहा हजारांची मदत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, याची खिल्ली उडवताना, पाच माणसाच्या शेतकरी कुटुंबाला महिना ५०० रुपये, म्हणजे दिवसाला ३-४ रुपये वाट्याला येतील, ही काय भीक देताय की मदत? शेतकरी सक्षम आहे. त्याला फक्त पाणी, स्वस्तात खते-औषधे आणि बाजारभाव द्या, असेही पवार म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com