छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः शरद पवार

शरद पवार
शरद पवार

चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत आहे, छपन्न इंचाची छाती आहे, असे सांगतात हे योग्य नाही. छपन्न इंचाच्या छातीच्या गप्पा कशाला, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून हे सरकार घालवले पाहिजे. शिरूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन करा, भाकरी फिरवा, असे आवाहन पवार यांनी चाकण, भोसे (ता.खेड) येथील जाहीर सभेत रविवारी (ता.१७) येथे केले. खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, सध्या शेतकरी, जवान अडचणीत आहेत. पण हे सरकार काही करत नाही. नोटाबंदीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला हे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आम्ही मिळवून दिली. पण या सरकारने कर्जमाफी मिळवून दिली नाही. कर्जमाफीचा फायदा कमी शेतकऱ्यांना झाला. खेड तालुक्‍यात विमानतळ झाले पाहिजे, विमानतळाला विरोध करू नका हे मी खासदाराला सांगितले होते. त्यामुळे परिसराचा विकास होणार आहे. पण या खासदाराने विरोध केला, त्यामुळे या भागातील विमानतळ गेले. त्याचा परिणाम येथील विकासावर झाला आहे. ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात या वेळी दिलेला उमेदवार डॉ. कोल्हे उच्चशिक्षित आहे. जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी कुटुंबातील आहे. कोल्हे अभिनेता असला तरी त्यांनी मालिकांतून भूमिका करून एक राष्ट्रसेवा केली आहे. योग्य उमेदवार दिल्याने त्याला निवडून द्या,’’ असे पवार यांनी म्हणाले.  या वेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, माझ्यावर खासदार वैयक्तिक टिका करतात. पण मी वैयक्तिक टिका करणार नाही. यापूर्वी खासदारांच्या विरोधात तगडे उमेदवार नव्हते, असा प्रचार त्यांनी केला. पण या वेळी मी त्यांच्याविरोधात शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित तगडा उमेदवार देत आहे. जनतेने पंतप्रधान कोण होणार आहे, यासाठी मतदान न करता खासदार कोण होणार आहे, यासाठी मतदान करावे. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्हेंना संधी द्या, असे आवाहन केले. आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, विलास लांडे, मंगलदास बांदल आदींनी विचार व्यक्त केले. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, प्रदीप गारटकर आदी मान्यवरांसह व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. मेळाव्याचे प्रास्ताविक कैलास सांडभोर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी करून उपस्थितांचे आभार कैलास लिंभोरे यांनी मानले. मी विडा उचलला... डॉ. कोल्हेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार विलास लांडे यांचे समर्थक नाराज झाले होते. तसेच लांडे हे नाराज असल्याची चर्चा होती. मेळाव्यात लांडे भाषणाला उभे राहिले. त्या वेळी टाळ्या, शिट्ट्या वाजल्या आणि लांडे यांनी खासदार आढळराव यांच्यावर कडक टिका करून कोल्हे यांच्या उमेदवारीवर मी नाराज नाही. आम्ही शरद पवार यांच्या विचारांना मानतो. निरागस, तरुण, उच्चशिक्षित कोल्हे विजयी होण्यासाठी मी विडा उचलला आहे असे सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील लोकसभेसाठी इच्छुक असलेले लांडे, मंगलदास बांदल यांची भाषणे जोरात झाली. आणि दोघांनीही कोल्हे निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. त्यामुळे दोघांची पक्षातील अंतर्गत नाराजी संपली असे स्पष्ट झाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com