शर्कराकंद वाण देशातच तयार करा; शरद पवार यांची सूचना

शर्कराकंद वाण देशातच तयार करा; शरद पवार यांची सूचना
शर्कराकंद वाण देशातच तयार करा; शरद पवार यांची सूचना

मांजरी, जि. पुणे : ‘‘दुष्काळी स्थिती विचारात घेता राज्यात शर्कराकंद  (बीट) लागवडीच्या चाचण्या पुन्हा सुरू कराव्यात तसेच उच्च दर्जाचे शुद्ध शर्कराकंद वाण सध्या आयात करावे लागते. विदेशी वाणाचा पैदास कार्यक्रम स्थानिक पातळीवर हाती घ्यावा,’’ अशा महत्त्वपूर्ण सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचा रविवारी (ता. २) यशस्वी समारोप झाला. ‘व्हीएसआय’च्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीसाठी श्री. पवार मांजरीत आले होते. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली मते, राज्यातील ऊस लागवड आणि साखर उद्योगाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागाशी संलग्न असलेल्या सिंचन व मृदा संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ व शर्कराकंदाचे अभ्यासक डॉ. इमाद युजाएल यांनी स्वतः या पिकाची माहिती बैठकीत दिली.

‘‘बीट, अर्थात शर्कराकंदापासून साखर निर्मितीचे काम विदेशात अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र लागवड सामग्रीची आयात करावी लागते. भविष्याची गरज विचारात घेता देशातच ही सामग्री उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारखान्यांकरिता पूरक पीक म्हणून आता शर्कराकंद लागवड वाढवायला हवी. त्यामुळे पाणी बचत आणि गाळप हंगामाचे दिवस वाढतील,’’ असे मत श्री. पवार यांनी व्यक्त केले. डॉ. इमाद या वेळी म्हणाले, की शर्कराकंदाच्या अमेरिकेतील दहा ओळींमधील जीवद्रव्य पेशी (जर्मप्लाझ्मा) आम्ही व्हीएसआयला देण्यास तयार आहोत. उष्णकटिबंधीय वातावरणात तग धरणारे उच्च क्षमतेचे ते वाण आहे. त्याची लागवड आधी नियंत्रित वातावरणात व्हीएसआयने करावी. त्यानंतर पैदाशीचा कार्यक्रम हिमालयातील शीत प्रदेशात घ्यावा. पुढील टप्प्यात चांगली लागवड सामग्री शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येईल.” ही संकल्पना श्री. पवार यांना आवडली.  

मराठवाड्यात ‘पूर्णा’ तसेच सोलापूरच्या ‘विठ्ठलराव शिंदे’ साखर कारखान्यात शर्कराकंदाची चाचणी लागवड करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. कंद लागवडीचा खर्च एकरी २५ हजार रुपये आहे. व्हीएसआय व साखर कारखान्यांनी किंवा शेतकऱ्यांनी हा खर्च समसमान वाटून घेण्याचे ठरविले. यामुळे कंद लागवडीला पुन्हा प्रायोगिक सुरुवात होईल. भौगोलिक स्थिती व पाण्याची टंचाई या दोन्ही मुद्द्यांवर मराठवाड्यातील शर्कराकंद कसा प्रतिसाद देते याचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन करण्याचे व्हीएसआयने ठरविले आहे. कंदाच्या चाचण्या एक दशकापूर्वीच राज्यात सुरू केल्या होत्या. मांजरी प्रक्षेत्रावर या कंदाच्या तीन वाणांच्या चाचण्या सुरू असून, इतर तीन साखर कारखान्यांनी सध्या कंद लागवड केली आहे.

या वेळी व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सदस्य विजयसिंह मोहिते पाटील, बबनदादा शिंदे, इंद्रजित मोहिते, गणपतराव तिडके, बी. बी. ठोंबरे, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महासंचालक शिवाजीराव देशमुख, संचालक विकास देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com