सोलापुरात ऊस दरप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक

गाळप हंगाम
गाळप हंगाम

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा अद्यापही न सुटल्याने शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवण्याचा प्रयत्न विविध शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळिराजा शेतकरी संघटना, प्रहार संघटना या संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आक्रमक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात गाळप सुरू झाले, तरी त्यात विस्कळितपणा आला आहे.  साखर कारखानदार आणि सहकारमंत्र्यांची मिलीभगत आहे. ऊसदराचा तोडगा काढण्यात सहकारमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे येत्या बुधवारी (ता. १५) सुभाष देशमुख यांच्या सोलापूर येथील घरासमोर १५ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचे तीन साखर कारखाने आहेत. त्यांनी ऊसदराची कोंडी फोडणे आवश्‍यक असताना, मंत्र्यांनीच जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांप्रमाणे मौन बाळगले आहे. सहकारमंत्र्यांची जिल्ह्यातील साखर कारखानदारांबरोबर असलेली मिलीभगत या निमित्ताने समोर आली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात ऊसदराचा तिढा आणखी वाढला आहे. कोणत्याही परिस्थितीत पहिली उचल दोन हजार ७०० रुपये घेतल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेने घेतली आहे.

‘प्रहार’कडून ऊसतोड बंद  उसाला तीन हजार ४०० रुपये दर मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्‍यात प्रहार संघटना कुरनूर धरणपट्ट्याच्या क्षेत्रात आक्रमक झाली. तालुकाध्यक्ष राजसाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड थांबविण्यात आली, यात या भागातील सर्व शेतकऱ्यांना सामावून घेत आंदोलन केले. चुंगी, किणी, हन्नूर, बोरेगाव, बऱ्हाणपूर, चपळगाव, बावकरवाडी, कुरनूर येथे तोड थांबवण्यात आली. या आंदोलनाबाबत चव्हाण म्हणाले, मंत्री व नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मताची आठवण ठेवावी व तीन हजार ४०० रुपये दर देण्याचा सकारात्मक विचार करावा. गुजरातला प्रतिटनाला चार हजार ४४१ रुपये दर आहे, मग महाराष्ट्रातच कमी का, याचा विचार सरकारने करावा.  पंढरपुरात ‘स्वाभिमानी’चे उपोषण पंढरपूर तालुक्‍यात ऊसदर आंदोलनाचा भडका उडाला असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवारी चौथ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच आहे. दरम्यान, उपोषणाकडे अद्यापही जबाबदार प्रशासकीय अधिकारी फिरकला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. पहिली उचल तीन हजार ४०० रुपये जाहीर केली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी व्यक्त केला. सरकारने हस्तक्षेप करून ऊसदराचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.  शुक्रवारी ‘लोकमंगल’वर ठिय्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकरी संघटनाही येत्या शुक्रवारी (ता. १७) सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलन करणार आहे, असे उमाशंकर पाटील यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com