नवं ज्ञान, तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना मिळाली शिदोरी

नवं ज्ञान, तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना मिळाली शिदोरी
नवं ज्ञान, तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना मिळाली शिदोरी

औरंगाबाद ः शेती क्षेत्रातील नवनवीन ज्ञान, तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, शेतीपूरक आणि प्रक्रिया उद्योगाच्या माहितीची भूक भागवणारी शिदोरी शेतकऱ्यांना देत ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने येथील जबिंदा मैदानावर सुरू असलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (ता. ३०) समारोप झाला. गेल्या चार दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि राज्याच्या अनेक भागांसह मध्यप्रदेशातून आलेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला उच्चांकी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतीत उमेद वाढवणारी कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील ५१ युवा शेतकऱ्यांचा सन्मान हे यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य राहिले.   ‘सकाळ-अॅग्रोवन’ने आयोजिलेल्या या कृषी प्रदर्शनाला चारही दिवस शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस अॅक्मे मॅट, बसवंती मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी विविध शेतीविषयक तंत्रज्ञान जाणून घेतले. तसेच कृषी अवजारांची प्रात्यक्षिके पाहिलीच, पण समृद्ध गटशेती, नैसर्गिक शेती, मधमाशीपालन, प्रक्रिया उद्योग आणि पीक पद्धतीतील बदलातून किफायतशीर शेती अशा विषयांवरील तज्ज्ञांच्या चर्चासत्राला आवर्जून हजेरी लावत आपल्या ज्ञानाची भूक भागवली.   प्रदर्शनाची वेळ सकाळी अकराची होती, पण सकाळी आठ वाजलेपासूनच शेतकरी प्रदर्शनासाठी दाखल होत होते. चार दिवसांत सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांची वर्दळ राहिली. प्रदर्शनस्थळी प्रवेश करताच ‘बॅक हो लोडर’ यांसारखे यंत्र शेतकऱ्यांना आकर्षित करत होते. त्याशिवाय ठिबक सिंचनासंबंधीत विविध उपकरणांचे स्टॅाल्स, शेततळ्याचे प्लॅस्टिक पेपर्स, ट्रॅक्टरचलित, बैलचलित पेरणी यंत्र, सारा यंत्र, नांगर, फवारणी यंत्र, पॅावरलिटर आणि आंतरमशागतीची विविध अवजारे आणि त्यातील नवतंत्रे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच पशुखाद्यनिर्मिती, कडधान्य प्रक्रिया, पेरणीयंत्रे, दूध काढणी यंत्रे, तेल काढणी यंत्रे शेतकऱ्यांसाठी उत्सुकतेची ठरली.  पूर्वा केमटेक परिवाराने साकारलेले आदर्श सेवरगाव, मधमाशी उद्यान हे या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य राहिले. कृषी विभागाच्या शेतकरी गट आणि महिला बचत गटांकडून उभारल्या गेलेल्या विविध स्टॉल्सवरील दर्जेदार शेतीमालाची माहिती घेताना शेतकऱ्यांसह शहरी ग्राहकही हरकून गेले. याचठिकाणी थेट शेतकरी ते ग्राहक संवाद होत सुमारे ५० लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक स्टॉलधारकांनी खास शेतकरी आणि ग्राहकांसाठी बक्षिसे ठेवली होती. त्यामुळे खरेदीचा वेगळा आनंदही ग्राहकांनी घेतला.  ...अन्‌ युवा शेतकरी भारावले ‘सकाळ- अॅग्रोवन’च्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील युवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मराठवाड्यातील ५१ तरुण शेतकऱ्यांना ‘अॅग्रोवन’ युवा शेतकरी सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यात ४० युवा शेतकरी आणि ११ महिला युवा शेतकऱ्यांचा समावेश होता. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराने हे युवा शेतकरी भारावून गेले. यातून आणखी प्रेरणा घेत आणखी विविध प्रयोग गावशिवारातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुरस्कारविजेत्या महिला शेतकरी वैशाली घुगे यांनी ‘अॅग्रोवन’विषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली, या पुरस्काराने आम्हाला आणखी बळ मिळाले, असे सांगितले. भाग्यवान विजेत्या शेतकऱ्यांना नांगर आणि पेरणीयंत्र कृषी प्रदर्शनात आलेल्या शेतकऱ्यांसाठी खास लकी ड्रॅा योजना कंपन्यांनी राबवली होती. प्रदर्शनातील चर्चासत्रादरम्यान काढण्यात आलेल्या लकी ड्रॅामधून भाग्यवंत विजेत्या शेतकऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शेतीपयोगी अवजारांची बक्षिसे देण्यात आली. त्यात नांगर आणि पेरणीयंत्रासारख्या यंत्रांचा समावेश राहिला. शेतकऱ्यांना अनपेक्षितपणे मिळालेल्या या भेटीने शेतकऱ्यांना त्याचे भारीच कौतुक वाटले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com