नाशिकमध्ये 'शिवभोजन’ थाळी सुरू

नाशिकमध्ये 'शिवभोजन’ थाळी सुरू
नाशिकमध्ये 'शिवभोजन’ थाळी सुरू

नाशिक  : ''शिवभोजन योजना'' ही राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात जेवण देणारी सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभर पन्नासहून अधिक ठिकाणी शिवभोजन प्रकल्प सुरू होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू झाली. रविवार (ता. २६) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन झाले.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रेरणा महिला बचतगट संचलित बळिराजा रेस्टॉरंट येथे शिवभोजन केंद्राचे उद्‌घाटन झाले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, उपायुक्त पुरवठा अर्जुन चिखले, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नर्सिकर, पोलिस निरीक्षक अशोक भगत, प्रेरणा महिला बचतगट अध्यक्षा कविता कर्डक आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, शिवभोजन केंद्रावर स्वच्छ स्वरूपात आणि चांगल्या दर्जेचे जेवण सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार शिवभोजन केंद्रांची व त्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय तसेच प्रत्येक भोजनालयात कमाल ५०० थाळी सुरू करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. यास मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागांत राबविण्यात येईल. असे त्यांनी या वेळी नमूद केले. या वेळी जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, शिवभोजन थाळीच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे अन्न देण्यात येणार आहे. या योजनेत सेंट्रल किचन व स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी या वेळी केले.  अशी असणार शिवभोजन थाळी  शासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक भात व १०० ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी देण्यात येईल. ही भोजनालये दुपारी १२ ते २ या कालावधीत कार्यरत राहणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com