राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरी

राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरी
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरी

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी (ता. १९) संपूर्ण राज्यासह देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी मिरवणुका, रथयात्रा, ढोल-ताशा वादन, बाइक रॅली, पोवाडे, शिवगीतांचे गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

मुंबईत शिवतीर्थावर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिवादन केले. शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आदींनी उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.   

पुणे शहरासह जिल्ह्यात शिवकाळातील सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे, वीर माता यांच्या ८५ वंशांसह विविध मंडळे, संघटांनी मिरवणुकांसह विविध उपक्रमांद्वारे शिवजयंती साजरी केली. नगरमध्ये शिवजयंती मिरवणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. 

औरंगाबादच्या क्रांती चौकातही पोवाडा आणि शिवगीतांच्या वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. शिवनेरी किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या पेठवडगावमध्ये ४०० विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करून शिवरांयाना अभिवादन केले. जळगावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी महिलांच्या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. महापौर भारती सोनवणे, स्थायी सभापती सुचेता हाडा यांच्यासह महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

हिंगोलीत शिवाजी चौक परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सोलापुरात शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा पार पडला. नागपूरमध्येही ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. 

शिवनाम घोषणेने दणाणली दिल्ली दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. दिल्लीतील कार्यक्रमाला आठ देशांचे राजदूत उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठमोळ्या पोशाखात दिल्लीतील मराठी बांधवांनी महाराष्ट्र सदनात उपस्थित राहून शिवजयंती साजरी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com