राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, शिवसेना पुन्हा आक्रमक

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, शिवसेना पुन्हा आक्रमक
राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम, शिवसेना पुन्हा आक्रमक

मुंबई  : मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप झालेच पाहिजे, असे ठासून सांगताना, ज्या अर्थी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, असे म्हटले आहे, त्या अर्थी मी आपल्याला लिहून देतो की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे ठाम मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी व्यक्त केले. शिवसेनेने ठरवले तर आपले सरकार बनवू शकते, असे म्हणत राऊत यांनी भाजपला स्पष्ट इशारा दिला. तर येत्या आठवडाभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. सेना-भाजपच्या या भूमिकांमुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला आहे. भाजप सर्वाधिक आमदार संख्या असलेला मोठा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ७ नोव्हेंबरपर्यंत असून, त्याआधी राज्यात सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्रिपदासह समसमान सत्तेत सगळे फिफ्टी-फिफ्टी अशी शिवसेनेची मागणी आहे. तर उपमुख्यमंत्रिपदासह १८ मंत्रिपदे देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. मात्र, हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नाही. हा प्रस्ताव स्वीकारायचा झाल्यास सेनेला गृह खात्यासह नगर विकास आणि महसूल ही महत्त्वाची खाती हवी आहेत. पण ही खाती सोडण्यास भाजप तयार नसल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील सत्तापेचावर राज्यातच तोडगा काढण्याचे आदेश राज्य भाजप नेतृत्वाला दिले असले, तरीदेखील कोणत्याही चर्चेसाठी पुढे न जाता सेनेकडून काय प्रस्ताव येतो, याची राज्य भाजप नेतृत्व वाट पाहत असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांची सकारात्मकता यामुळे भाजपच्या गोटात संभ्रमाचे वातावरण असून, भाजपने 'थांबा आणि पाहा'ची भूमिका घेतल्याची माहिती आहे. काँग्रेसने कर्नाटकात फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वाधिक आमदार असूनही जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपद देऊ केले. राज्यातही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस हायकमांड वेगळा विचार करू शकते, अशी माहिती आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे नवे समीकरण आकाराला येऊ शकते, अशी शक्यता आहे. ५ नोव्हेंबरला शपथविधी? शिवसेना भूमिकेवर ठाम राहिल्यास भाजप येत्या ५ नोव्हेंबर रोजी राजभवन येथे केवळ भाजप सरकारचा शपथविधी उरकून घेऊ शकेल, असे समजते. अल्प मतातील भाजप सरकारला डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. तोपर्यंत सेना सत्तेत सहभागी झाल्यास भाजप सरकार तरून जाईल, अन्यथा भाजपला विरोधी पक्षांची मदत घ्यावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com