मुख्यमंत्रिपदासह समसमान वाटपावर शिवसेना ठाम

मुख्यमंत्रिपदासह समसमान वाटपावर शिवसेना ठाम
मुख्यमंत्रिपदासह समसमान वाटपावर शिवसेना ठाम

मुंबई : ‘‘मला स्वतःहून युती तोडायची नाही, युती कायम राहावी, ही माझी इच्छा आहे. सगळे गोडीने व्हायला पाहिजे. भाजप अध्यक्ष अमित शहांसोबत ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. आता जो निर्णय आहे, तो भाजपने घ्यावा,’’ अशी भूमिका पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची बैठक गुरुवारी (ता. ७) पार पडली. 

या वेळी उद्धव ठाकरे यांना निर्णयाचे सर्वाधिकार देण्यात आले असून, खासदार संजय राऊतच केवळ पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील, असा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. उद्धव ठाकरे ५०-५० मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याची माहिती देण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेबाबत सर्व आमदारांचे मत आजमावून पाहण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. शिवसेना पुढील राजकीय रणनीती ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले होते. पोलिस बंदोबस्तामुळे मातोश्रीला छावणीचेच स्वरूप आले होते.

राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना गुरुवारी वेग आला आहे. एकीकडे भाजपच्या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह सत्तेतल्या समसमान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. 

सत्तेतल्या ५०-५० टक्के वाट्यावर शिवसेना ठाम आहे. लोकसभेच्या वेळी युतीचे जे ठरले होते, तसेच व्हावे याचाच पुनरुच्चार या बैठकीत झाला, अशी माहिती या बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण असू, अशी ग्वाही सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीत दिली. 

आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश नाहीत, त्यांना पुढील निरोप येईपर्यंत रंगशारदा येथेच थांबायचे आहे. शिवसेनेचे ५६ आमदार अधिक शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबणार आहेत. 

‘भाजपला धडा शिकविण्याची हीच वेळ’  दरम्यान, साहेब आता तडजोड करू नका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा, अशी ठाम भूमिका आमदारांनी या वेळी उद्धव ठाकरेंपुढे व्यक्त केली. गेल्या पाच वर्षात भाजपने शिवसेनेला खूप त्रास दिला. दुय्यम दर्जाची मंत्रिपदे शिवसेनेच्या गळ्यात मारली. पाच वर्षे निधीसाठी रखडवले. आता भाजपला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, अशा भावनाही सेना आमदारांनी व्यक्त केल्याचे समजते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com