वाशीम ःपीकविम्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

पीकविम्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको
पीकविम्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

वाशीम ः जिल्ह्यातील कारंजा,  मानोरा तालुक्यातील शेतकऱ्याना किमान १०० कोटी रुपयांचा पीकविमा मिळणे आवश्यक असताना कंपनीने केवळ एक कोटी नुकसानभरपाई मंजूर केली आहे. याविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला असून शिवसेनेने डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात कारंजा येथे रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळेपर्यंत शिवसेना आंदोलन करीत राहील, अशी घोषणा या वेळी करण्यात आली. 

या आंदोलनात डॉ. सुभाष राठोड, उपशहर प्रमुख कन्हैया ठाकूर, अनिल जाधव, विभाग प्रमुख गजानन वनारसे या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत पीकविमा कंपनीची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली.

जिल्ह्यामध्ये सतत चार वर्षांपासून दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. सन २०१८ च्या खरीप हंगामाची स्थिती सुद्धी गंभीर होती. सन २०१८ च्या खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यात एकूण २ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. या हंगामातील पीक नुकसानीची स्थिती पाहता यावर्षी कमीत कमी ३०० कोटी पीकविमा मिळणे अपेक्षित होते. परंतु कंपनीने जिल्ह्यात केवळ ५ कोटी दिले. त्यापैकी कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त १ कोटी पीकविमा मंजूर केला. अशा प्रकारची तुटपूंजी पिकाची नुकसान भरपाई मंजूर करणे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे, असे शेतकरी म्हणत आहेत. या कंपनीचा निषेध म्हणून शेतकरी व शिवसैनिकांनी आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com