प्रत्येकाच्या हृदयात शिवरायांचे स्थान अढळ : मुख्यमंत्री ठाकरे

‘‘आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत,’’ असे गौरवोद्‍गार मुख्यमंत्रीठाकरे यांनी काढले.
प्रत्येकाच्या हृदयात शिवरायांचे स्थान अढळ : मुख्यमंत्री ठाकरे
प्रत्येकाच्या हृदयात शिवरायांचे स्थान अढळ : मुख्यमंत्री ठाकरे

पुणे : ‘‘आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत,’’ असे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

शिवनेरीवर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव शुक्रवारी (ता. १९) उत्साहात साजरा झाला, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. छत्रपती संभाजीराजे, खा. डॉ.अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके, आ. विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे, हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, हृदयात शिवरायांचे स्थान आहे. सध्या वातावरण चांगले आहे, पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या, त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल-तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका.’’

उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे.  छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले यांचा आपणा सर्वांना अभिमान आहे. त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावांत महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं आणि आपल्या आपल्या सर्वांचं भाग्य आहे.’’

शिवनेरी परिसरातील विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी संपूर्ण शिवनेरीचे पावित्र्य, महत्त्व लक्षात घेता विकासकामे दर्जेदार करावीत, तसेच कामे वेळेत सुरू करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. राज्य तसेच शिवनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता योग्य अंतर, मास्कचा वापर, गर्दी टाळा, तसेच शासनाच्या दक्षता नियमांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले.खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘‘शासनाने किल्ला संवर्धन व जतनाबाबत मोहीम हाती घ्यावी, तसेच समुद्रातील किल्ल्यांबाबत वाहतूक व्यवस्था करून पर्यटनाला गती द्यावी.’’

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलिस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. या वेळी आदिवासी पारंपरिक नृत्य सादरीकरण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी ‘शिवयोग’ या टपालाचे विशेष आवरण (कव्हर), तसेच वन विभागाच्या माध्यमातून ३९१ वृक्षांच्या रोपणांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com