नगर जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या साम्राज्याला धक्का

नगर जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या साम्राज्याला धक्का
नगर जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या साम्राज्याला धक्का

नगर ः विधानसभा निवडणुकीच्या निकालाने नगर जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या साम्राज्याला हादरा दिला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेसला ६, कॉँग्रसेला २ जागा मिळाल्या. भाजपला २ जागांवर विजयी तर एका जागेवर आघाडीवर होते. तसेच एका ठिकाणी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विजयी झाला. तर शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेतील उपाध्यक्ष विजय औटी, पक्षांतर करून भाजपात गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड, माजी मंत्री आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री अनिल राठोड, आमदार स्नेहलता कोल्हे यांचा धक्कादायक पराभव झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतःसह शेजारचा श्रीरामपूर मतदारसंघ राखला. विखे यांनी आपला मतदारसंघ राखत मोठे मताधिक्य मिळवले.  

विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निकालाने अनेकांना धक्का दिला आहे. नगर जिल्ह्यावर राज्याचे लक्ष असते. नगरमध्ये लोकसभेला दोन्हीही मतदारसंघांत सेना-भाजपने मोठे मताधिक्य मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत मात्र सेना- भाजपला लोकांनी स्पष्टपणे नाकारले असल्याचे निकालातून दिसून येत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. जशी मोजणीच्या फेऱ्यांची माहिती येत होती, तसे जिल्ह्याचे चित्रही बदलत होते. अनेक उमेदवारांनी सुरवातीला आघाडी घेतली. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर गेल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्याच्या काही मतदारसंघांत जातीय समीकरणे बांधून निकालाचे गणिते मांडली जात होती. तीही या निवडणुकीत फोल ठरल्याचे दिसून आले. शरद पवार यांनी घेतलेल्या सभांची जादू नगर जिल्ह्यात चालली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असले तरी पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेतील उपाध्यक्ष विजय औटी, मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड, माजी मंत्री, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा धक्कादायक पराभव झाला. संग्राम जगताप वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विजयी उमेदवार नवीन चेहरे आहेत. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. 

बारा ‘झिरो’ फेल  नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात अग्रभागी असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लोकसभा निवडणुकीत भाजपवासी झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी व कॉँग्रेसवर सातत्याने राग व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व बारा जागा शिवसेना-भाजपच्या निवडून आणणार असे अनेक वेळा सांगितले. अगदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचाही पराभव करणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र बारा ‘झिरो’ फेल झाले आहे. 

पवारांच्या तिसऱ्या पिढीची एंट्री राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तिसऱ्या पिढीने नगर जिल्ह्यामधून विधानसभेच्या राजकारणात एंट्री केली. पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री व सलग दहा वर्षे येथून आमदार असलेले राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. राज्यात कर्जत-जामखेडची लढत लक्षवेधी होती.  येथे स्थानिक व बाहेरचा असा मुद्दा शेवटच्या टप्प्यात पुढे आला होता.

महत्त्वाच्या घडामोडी

  • अनेक वर्षे मंत्री राहिलेल्या मधुकर पिचड यांचे पक्षांतर लोकांना पचले नाही. तेथे त्यांचे चिरंजीव वैभव पिचड मोठ्या मतांनी पराभूत झाले आणि सामान्य चेहरा म्हणून किरण लहामटे यांना लोकांनी स्वीकारले आहे. 
  • कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार निवडून आले. येथे ‘मोठा विकास केला़’ हा राम शिंदे यांचा दावा फोल ठरला. त्यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. 
  •  बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत आपले गड राखले. 
  • नेवाशात माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव, मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार शंकरराव गडाख राष्ट्रवादीच्या मदतीने अपक्ष निवडून आले. आमदार बाळासाहेब थोरात पराभूत झाले. 
  • माजी मंत्री, आमदार शिवाजी कर्डिले यांचाही राहुरीतून धक्कादायक पराभव झाला आहे. नगर शहरातून त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांनी मात्र आपली जागा राखली. 
  •  निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेले आमदार भाऊसाहेब कांबळे यांना लोकांनी नाकारत साहित्यिक लहू कानडे यांना लोकांनी निवडून दिले. 
  • श्रीगोंदा मतदार संघात प्रत्येक फेरीत मतांत चढउतार होत होता. अगदी शेवटच्या टप्प्यात माजीमंत्री बबनराव पाचपुते आघाडीवर होते आणि राष्ट्रवादीचे घनशाम शेलार अल्प मताने मागे पडले. 
  • शेवगाव-पाथर्डी मतदार संघात सुरवातीला पिछाडीवर पडलेल्या भाजपच्या मोनिका राजळे नंतर आघाडीवर आल्या आणि आपली आमदारकी शाबुत ठेवत माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव प्रताप ढाकणे यांचा पराभव केला. 
  • कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे अशुतोष काळे ८४७ मताने विजय मिळवला. त्यांनी विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला.
  •  नगर शहर ः संग्राम जगताप (राष्ट्रवादी)  अकोले ः किरण लहामटे (राष्ट्रवादी)  शेवगाव- पाथर्डी ः मोनिका राजळे (भाजप)   पारनेर ः नीलेश लंके (राष्ट्रवादी)  कर्जत-जामखेड ः रोहित पवार (राष्ट्रवादी)   राहुरी ः प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)   श्रीरामपूर ः लहू कानडे (कॉँग्रेस)   संगमनेर ः बाळासाहेब थोरात (कॉँग्रेस)  कोपरगाव ः आशुतोष काळे (राष्ट्रवादी)   नेवासा ः शंकरराव गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष)  श्रीगोंदा ः बबनराव पाचपुते (भाजप आघाडीवर)   शिर्डी ः राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

    पक्षनिहाय मिळालेला जागा   राष्ट्रवादी ः  (६)   भाजप ः  (२)  कॉँग्रेस ः  (२)  शिवसेना ः (०)  अपक्ष (राष्ट्रवादी पुरस्कृत) (१)   भाजपची एक जागा आघाडीवर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com