नाशिक जिल्ह्यात चारा लागवडीस अल्प प्रतिसाद

नाशिक जिल्ह्यात चारा लागवडीस अल्प प्रतिसाद
नाशिक जिल्ह्यात चारा लागवडीस अल्प प्रतिसाद

नाशिक : नाशिक भागातील धरणातील पाणीसाठा संपुष्टात येताना उपलब्ध होणाऱ्या क्षेत्रावर चारा लागवड करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. प्रशासनाकडे आतापर्यंत १२० इच्छुक लाभार्थींचेच अर्ज प्राप्त झाले आहेत. चारा लागवड करू इच्छिणाऱ्यांनी २० डिसेंबरपर्यंत तालुका पातळीवरील पंचायत समिती कार्यालये, पशुधन विकास कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ही बाब मंगळवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाली. जिल्ह्यातील ३ हजार ७५० एकर गाळपेरा क्षेत्रावर १२०० हून अधिक लाभार्थी चारा लागवड करू शकणार आहेत. दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी धरणांच्या गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाजरी, मका आणि घास या प्रकारच्या चाऱ्याची लागवड करण्यासाठी प्रशासनाकडून मोफत बियाणे पुरविण्यात येणार आहेत. एका शेतकऱ्याला तीन एकरांपर्यंतचे क्षेत्र चारा लागवडीसाठी मिळेल. २० डिसेंबरपासून चारा लागवड सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात किमान १२०० लाभार्थींना चारा लागवडीचा लाभ मिळणे, जिल्हा प्रशासनाला अभिप्रेत आहे. गाळपेरा क्षेत्रावर पिकविलेल्या चाऱ्याची संबंधित लाभार्थी विक्री करू शकणार आहेत. त्याचा दर ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे.

चारा लागवड बंधनकारक

गाळपेऱ्याचे क्षेत्र सरकारच्या मालकीचे आहे. अनेक शेतकरी वर्षानुवर्षे त्यावर भाजीपाला पिकवितात. आताही जिल्ह्यातील अनेक जलाशयांच्या कोरड्या क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आल्याचे पाहावयास मिळते. हा भाजीपाला निघाल्यानंतर या क्षेत्रावरही संबंधित शेतकऱ्यांना चारा लागवडच करावी लागेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com