निर्यात प्रोत्साहन साह्य बंदचा प्रभाव तात्पुरता

अतिरिक्त उत्पादनामुळे गेल्या वर्षी कांदा बाजार मंदीत होता पुरवठावाढ कमी व्हावी म्हणून निर्यात प्रोत्साहनाची मागणी पुढे आली. तशातच पाकिस्तानी रुपया भारताच्या तुलनेत कमजोर होणे आणि त्या देशाची निर्यात पडतळ भारतापेक्षा स्वस्त होणे, या कारणानेही निर्यात प्रोत्साहन मागणीला बळ मिळाले. निर्यात प्रोत्साहानाचा मूळ उद्देश उत्पादनवाढ व पुरवठावाढीने निर्मिती मंदीच्या परिस्थितीत देशांतर्गत कांदा बाजाराला पर्यायाने, शेतकऱ्याला आधार देणे हा होता. यंदा एप्रिलपासून पुढे बाजार हळूहळू मंदीच्या आवर्तनातून बाहेर येत होता. मे च्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारात आणखी सुधारणा झाली. वरील पार्श्वभूमीवर, प्रोत्साहन योजना बंद झाली आहे. प्रोत्साहन योजना बंद असली तरी निर्यात सुरू आहे. - दीपक चव्हाण, शेती अभ्यासक, पुणे.
कांदा
कांदा

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यासाठीचे निर्यात प्रोत्साहन साह्य बंद केल्याने बुधवारी (ता. १२) राज्यातील महत्त्वाच्या काही बाजार समित्यांमध्ये दर १०० ते १५० रुपयांपर्यंत कमी झाले होते. परंतु, ‘‘दराची ही स्थिती काही काळापुरती राहील. कांदा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने पुरवठा कमी होईल आणि दर पुन्हा पूर्वपातळीवर येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने कांदा बाजारात आणावा,’’ असे आवाहन कांदा बाजारातील जाणकारांनी केले आहे.  भारतातून व्यापारी वस्तूंच्या निर्यातीसंबंधी असलेल्या ‘एमईआयएस’ योजनेंतर्गत केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी १० टक्के निर्यात प्रोत्साहन साह्य २८ डिसेंबर २०१८ ला जाहीर केले होते. या योजनेची मुदत ३० जून २०१९ पर्यंत होती. मात्र देशातील कांदा उत्पादक महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दुष्काळी स्थिती असल्याने उत्पाद घटले होते आणि बाजारात कांदा दर सुधारले त्यामुळे मंगळवारी (ता. ११) केंद्राने ही योजना बंद करत निर्यात प्रोत्साहन साह्य बंद केले. केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन साह्य शून्य टक्के केल्याने राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांदा दरात ५० ते १५० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.  कांद्याचे मुख्य आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह पिंपळगाव बसवंत, देवळा, येवला, बाजार समित्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याची आवक होत मोठ्या प्रमाणावर आवक आहे. आशिया खंडातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत दररोज साधारणत: २० ते २५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. येथे कांद्याला सरासरी १३२५ रुपये दर मिळत होता. गेल्या १० ते १५ दिवसांपासून कांदा भावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत होते. असे असताना अचानक झालेल्या या निर्णयाने दरात प्रतिक्विंटल १५० रुपये घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पुन्हा ही योजना सुरू करण्याची मागणी केली.  सध्य स्थितीत असलेली दुष्काळी परिस्थिती व काही काळ पडलेले बाजारभाव यामुळे कांदा उत्पादक आगार अडचणीत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत मान्सूनची चिन्हे समोर दिसत असताना शेतकऱ्यांनी खरिप लागवडीची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना सध्या भांडवलाची गरज असून साठवून ठेवलेला कांदा बाजारात आणत आहेत. त्यामुळे दर कमी झाल्याने आमचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.  पिंपळगाव बसवंत बाजारसमितीमध्ये आवकेवर परिणाम झालेला नाही ८०० नागांचे सातत्य टिकून आहे मात्र भावात घट झाली आहे. देवळा बाजार समितीमध्ये (ता.१०) रोजी ४५० नगांची आवक होती ती कमी होऊन २५० पर्यंत आली आहे. भावतही १०० रुपयांची घट आहे.  भीतिपोटी कांदा विक्री करू नकाः चव्हाण निर्यात प्रोत्साहन बंद झाले म्हणून कांदा बाजार पुन्हा मंदीत येईल, अशी धारणा अजिबात बाळगू नये. अल्पकालासाठी बाजारात थोडी नरमाई दिसेल, पण बाजारभावाचे दीर्घकालीन चित्र किफायती दिसतेय. कारण, नवे पीक येईपर्यंत म्हणजेच येत्या ऑक्टोबरपर्यंत बाजारात जुन्या कांद्याचा संतुलित प्रमाणात पुरवठा राहणार आहे. या वर्षी मागच्यासारखी अतिरिक्त उत्पादन व साठ्याची समस्या नाही, असे शेतमाल बाजार विश्‍लेषक दीपक चव्हाण म्हणाले.  प्रतिक्रिया

कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने कांदा निर्यातीस चालना देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस आणखी मुदतवाढ द्यावी, अशी आमची  मागणी आहे.  - जयदत्त होळकर,  सभापती, लासलगाव बाजार समिती

दोन पैसे कष्टाचे मिळत होते. सरकारने हा निर्णय घेऊन अचानक हस्तक्षेप केल्याने आमचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घ्यावा, उगाच आमचे नुकसान नको. - विजय पवार,  कांदा उत्पादक शेतकरी, बेज, ता. कळवण

शेतकरी अगोदरच अडचणीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र सरकारने ऐन दुष्काळात हा निंराय घेतल्याने आमच्यावर पुन्हा संकट कोसळणार. - अमोल गागरे,  कांदा उत्पादक, वागदर्डी, ता. चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com