साखर हंगामाच्या प्रारंभीच ऊसतोडणी मजुरांची टंचाई

दक्षिण महाराष्ट्रात हंगामाच्या प्रारंभीच कराराच्या सरासरी तीस टक्के मजूर कमी आल्याने याचा परिणाम गाळपावर होत आहे. मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता असताना अनेक नामवंत कारखान्यांचा हंगाम निम्म्या क्षमतेवरच सुरू झाला आहे.
साखर हंगामाच्या प्रारंभीच ऊसतोडणी मजुरांची टंचाई  Shortage of sugarcane workers at the beginning of the sugar season
साखर हंगामाच्या प्रारंभीच ऊसतोडणी मजुरांची टंचाई Shortage of sugarcane workers at the beginning of the sugar season

कोल्हापूर : ऑक्‍टोबरच्या जोरदार पावसाने कारखान्यांची त्रेधा उडविली असतानाच आता दक्षिण महाराष्ट्रात हंगामाच्या प्रारंभीच कराराच्या सरासरी तीस टक्के मजूर कमी आल्याने याचा परिणाम गाळपावर होत आहे. मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता असताना अनेक नामवंत कारखान्यांचा हंगाम निम्म्या क्षमतेवरच सुरू झाला आहे. याचा ताण ऊसतोडणी यंत्रणेवर येत आहे.

कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्यातील साखर कारखान्यांपुढे आता पूर्ण क्षमतेने गाळपाचे आव्हान उभे राहिले आहे. वाफसा येत असला तरी मजूर नसल्याने ऊसतोडणीची गती मंदावली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखाने मराठवाड्यातील ऊसतोड मजुरांवर अवलंबून असतात. गेल्या वर्षी हंगाम संपतानाच कोविडचे संकट सुरू झाले. यात ऊसतोडणी कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागला. यातच यंदा मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला. परिणामी, अनेक ऊसतोडणी कामगारांनी ऊसतोडीपेक्षा स्वत:च्या शेतात कामास प्राधान्य दिले आहे. यामुळे प्रतिवर्षी प्रमाणे मजूर येण्याचा ओघ कमी आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करुनही करार केलेले ऊसतोडणी मजूर न आल्याने वाहनधारक हतबल झाले आहेत.

शेती विभागाचे नियोजन विस्कटले हंगामाच्या प्रारंभी साखर कारखान्यांच्या शेती विभागाने क्रमपाळीनुसार तोडणीचे नियोजन केले होते. पण मध्यंतरीच्या पावसाने वेळापत्रक बिघडविले. ही घडी बसत असतानाच आता मजूर नसल्याने तोडणीस आलेले प्लॉट रखडले. काही कारखान्यांनी ऊस यंत्राने तोडणी सुरु केली असली तरी पुरेशा वाफसाअभावी यंत्राने ऊस तोडताना मर्यादा येत आहेत. यामुळे सुरवातीच्या टप्प्यात तरी मजुरांवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे शेती विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मजूर येईपर्यंत पूर्ण क्षमतेने गाळप अवघड विपरीत परिस्थितीमुळे राज्याच्या तुलनेत दक्षिण महाराष्ट्रातील गाळप कमी गतीनेच होईल, अशी भीती साखर कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली. दिवाळीनंतर मजूर येण्याचे प्रमाण वाढले आहे, पण पूर्ण क्षमतेने साखर कारखाने सुरू करणे नोव्हेंबरअखेरपर्यंत शक्‍य नसल्याचे कारखाना प्रतिनिधींचे म्हणणे आहे. गाळप क्षमतेएवढा ऊस तोडणीस उपलब्ध नसल्याने सर्वच घटकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

प्रतिक्रिया पाऊस व मजुरांमुळे ऊसतोडणी यंत्रणेचा कार्यक्रम विस्कळीत झाला आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या वातावरणातच आम्हाला सातत्याने नियोजनात बदल करावे लागत आहेत. मजुरांची अनुपलब्धता ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. - दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी,  दत्त साखर कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर

यंदा हंगामाच्या प्रारंभी व्यक्त केलेली मजूर टंचाईची भीती पहिल्याच टप्प्यात खरी ठरली आहे. आता कमी पडणारी ऊसतोडणी यंत्रणेची जुळवाजुळव करावी लागत आहे. यामुळे सध्या तरी क्षमतेइतके गाळप करणे अशक्‍य बनत आहे. - महावीर ऐनापुरे, मुख्य शेती अधिकारी, शरद साखर कारखाना,  नरंदे, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com