समतोल विकासासाठी कृतीवर भर द्यावा ः हरिभाऊ बागडे

समतोल विकासासाठी कृतीवर भर द्यावा ः हरिभाऊ बागडे
समतोल विकासासाठी कृतीवर भर द्यावा ः हरिभाऊ बागडे

औरंगाबाद ः मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे. जल आराखड्यात त्याचा समावेश व्हावा. मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर होऊन विकास व्हावा, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अभ्यासकांनी एकत्र यावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी कृतीवर अधिक भर द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले. 

मराठवाडा विकास मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एकात्मिक राज्य जल आराखडा व मराठवाड्यातील विविध प्रश्नांवरील चर्चा संदर्भात गुरुवारी (ता. ३१) विभागस्तरीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत श्री. बागडे बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, नांदेडच्या महापौर शिला भवरे, जालन्याचे अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मंडळाचे सदस्य सचिव डी. एम. मुगळीकर, मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे, शंकर नागरे आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. बागडे म्हणाले, नगर-परळी रेल्वे महामार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. जलयुक्त शिवार अभियानाने महाराष्ट्रात किमया केली. पाणी अडवले. त्याचा उपयोग शेतीला झाला. दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत असतानाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला दिसत नाही. मराठवाड्याला पाण्याचे महत्त्व कळले आहे. मराठवाड्यासाठी पाणी अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे जल आराखड्यात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप होणे आवश्‍यक आहेच. शिवाय तो मराठवाड्याचा हक्क, अधिकार आहेच. तरीसुद्धा वर्तमान काळाचा विचार करून जनतेने पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. मराठवाडा विकास मंडळानेही आवडीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासकांना मंडळाच्या कार्यात सामावून घ्यावे. त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागेल. त्यांच्या सूचनातून मराठवाड्याचे व्हिजन डॉक्‍युमेंट तयार होण्यास मदत होईल, असेही सांगितले. आमदार बंब यांनी मराठवाड्याच्या पाण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिवाय जलआराखड्यात मराठवाड्याच्या पाण्याची नोंद होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विभागातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे. मंडळाने दर तीन महिन्याला मराठवाड्याच्या विकासावर आधारित बैठकीचे आयोजन करावे, अशा सूचना केल्या. 

औरंगाबादचे महापौर घोडेले, श्रीमती थोरे यांनीही शहराच्या विकासासासाठी आवश्‍यक सुविधा आणि पाण्याच्या प्रश्नाबाबत विचार मांडले. मराठवाड्यातील पाणी आणि उपलब्धता, आवश्‍यकता, मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्‍यक निधी आदींवर श्री. मुगळीकर, श्री. नागरे यांनी सादरीकरण केले. बैठकीचे प्रास्ताविक श्री. मुगळीकर यांनी केले. बैठकीस मराठवाड्यातील तज्ज्ञ सदस्य, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

मंडळामार्फत मराठवाड्याच्या विकासासाठी अभ्यास, संशोधन करून शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. मंडळ मराठवाड्याच्या विकासासासाठी कटिबद्ध असून, सातत्याने काम करणार आहे. - डॉ. भागवत कराड, अध्यक्ष मराठवाडा विकास मंडळ  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com