सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळ्याने दिपले डोळे

siddheshwar yatra
siddheshwar yatra

सोलापूर ः सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य असणारा अक्षता सोहळा मंगळवारी (ता. १४) दुपारी एकच्या सुमारास मंदिराच्या प्रांगणातील संमती कटट्यावर मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. अक्षता सोहळ्यामध्ये होणारे संमती वाचन आणि पाठोपाठ दीड्डम..दीड्डम.. सत्यम....सत्यम... चा जयघोष होताच एकाच वेळी अक्षतांसाठी उंचावलेल्या लाखो हातांमुळे हा अक्षता सोहळा जणू डोळे दिपवणारा ठरला.  यंदाही राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक सोलापुरात दाखल झाले होते. सकाळी सात वाजता बाळीवेशीतील हिरेहब्बू वाड्यातून मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने अक्षता सोहळ्यासाठी सिद्धेश्‍वर मंदिराकडे निघाले. मिरवणुकीदरम्यान संस्कारभारतीने मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या, बॅण्डपथकाचे सूर, सिद्धेश्‍वर महाराज की जय, एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र चा जयघोष करत मिरवणूक पुढे सरकत होती. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या भाविक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  बाळीवेस, दाते गणपती, दत्तचौक, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकटटा मार्गे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सातही नंदीध्वज सिद्धेश्‍वर मंदिरात दाखल झाले. त्या वेळी नंदीध्वजांच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांचे चेहरे आनंदाने खुलले. त्यात पारंपरिक वाद्यांसह नाशिक ढोलच्या दणदणाटाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला होता. पहा अक्षता सोहळ्याचा video... पंचरंगी ध्वजासह सातही मानाच्या नंदीध्वजांचे आगमन संमती कटट्याजवळ झाल्यानंतर सर्वांनी डोळे मिटून हात जोडून नमन केले. नंदीध्वजांच्या आगमनानंतर धार्मिक विधी झाले. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सिद्धेश्‍वरांच्या योगदंडाशी कुंभारकन्येचा विवाह सोहळा सुरू झाला. या वेळी हिरेहब्बूंनी सिद्धेश्‍वर यात्रेची थोडक्‍यात माहिती सांगितली. त्यानंतर सुहास शेटे यांनी समंती वाचन केले आणि दिड्डम...दिडड्डम...सत्यम...सत्यम...असा उच्चार करताच भाविकांचे लक्षावधी हात अक्षतेसाठी उंचावले. डोळे दिपवणारा हा सोहळा अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवला. राजकीय नेत्यांची हजेरी अक्षता सोहळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सौ. दीपाली भोसले, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, सौ. शिंदे, यात्रेचे समन्वयक तथा प्रांत अधिकारी हेमंत निकम, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नरसिंग मेंगजी, शिवशरण पाटील, शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्‍वस्त ॲड. मिलिंद थोबडे यांच्यासह राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com