खाद्यतेल तेजीत राहण्याची चिन्हे 

पामतेल आपल्या विक्रमी पातळीवर ट्रेड होतेय. त्यामुळे भारताने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाला पसंती दिली. मात्र महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक ब्राझील आणि अर्जेंटिनात उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
Signs of edible oil boom
Signs of edible oil boom

पुणे ः सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरात तेजी आहेत. पामतेल आपल्या विक्रमी पातळीवर ट्रेड होतेय. त्यामुळे भारताने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाला पसंती दिली. मात्र महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक ब्राझील आणि अर्जेंटिनात उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तर सूर्यफूल तेल पुरवठादार युक्रेन आणि रशियात युद्धजन्य स्थिती असल्याने आयात प्रभावित झाली आहे. जागतिक बाजारातील या परिस्थितीमुळे देशात पाम तेलाची टंचाई जाणवत असून देशातीलच रिफाइंड सोयाबीन तेलाला उठाव मिळत आहे. परिणामी सोयाबीनचे दर टिकून आहेत, असे जाणकारांनी सांगितले. 

भारत खाद्यतेलाचा जागतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक देश आहे. तर खाद्यतेल आयातीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताची वार्षिक खाद्यतेलाची गरज २२० ते २२५ लाख टनांच्या दरम्यान आहे. मागील दोन वर्षे देशात २३२ लाख टनांवर खाद्यतेलाचा वापर झाला. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचा वापर होत असला तरी उत्पादन मात्र खूपच कमी होते. देशातील खाद्यतेल उत्पादन ७० ते ९० लाख टनांच्या दरम्यान राहिले. देशाची खाद्यतेलाची गरज दिवसेंदिवस वाढत असताना उत्पादन मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. परिणामी, आयातीतून वाढलेली गरज भागवावी लागत आहे. मात्र मागील वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आली आहे. याचा फटका भारताला बसत आहे. कारण देशाची खाद्यतेलाची वार्षिक गरजेपैकी सुमारे ६५ टक्के तेल आयात करावे लागते. २०१८-१९ मध्ये खाद्यतेल उत्पादन ७४ लाख टनांवर होऊनही आयातही १५६ लाख टनांवर पोहोचली होती. देशात २०१९-२० मध्ये ७९ लाख टन खाद्यतेल उत्पादन झाले, तर १३४ लाख टन खाद्यतेल आयात करावे लागले. त्यासाठी ७१ हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर २०२०-२१ मध्ये १३२ लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आयातीसाठी तब्बल १ लाख १७ हजार कोटी रुपये मोजावे लागले. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे भारताला ४५ हजार कोटी रुपये अधिक मोजावे लागले. 

देशात आयात होणाऱ्या एकूण खाद्यतेलात जवळपास ७० टक्के वाटा पामतेलाचा आहे. देशात दाखल होणाऱ्या एकूण पाम तेलापैकी तब्बल ६० टक्के तेल हे इंडोनेशियातून येते. तर उर्वरित ४० टक्के पामतेल मलेशियातून आयात केले जाते. मात्र इंडोनेशियात पाम तेलाचे दर विक्रमी ५ हजार २२८ रिंगिट म्हणजेच १ हजार २४८ डॉलर प्रतिटनावर पोहोचले होते. 

पाम तेलाच्या दराचा भडका उडाल्याने इंडोनेशियालाही याचा फटका बसतोय. स्थानिक बायोडिझेल उद्योग आणि नागरिकांनाही झळ बसत असल्याने इंडोनेशिया सरकारने एकूण उत्पादनाच्या २० टक्के पाम तेल स्थानिक बाजारात विक्री करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामळे पाम तेलाची कमी उपलब्धता आणि भविष्यात इंडोनेशियाच्या धोरणामुळे उपलब्धतेबाबत अनिश्‍चितता आहे. तसेच पाम तेल आणि सोयाबीन तसेच सूर्यफूल तेल दरातील तफावत कमी झाली आहे.

युक्रेन, रशियामधील तणामुळे सूर्यफूल तेल आयात प्रभावित  भारतात युक्रेन आणि रशियामधून सूर्यफूल तेलाची आयात होते. युक्रेन जागतिक पातळीवर सूर्यफूल तेल उत्पादनात अग्रेसर आहे. तर रशियातही सूर्यफूल उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र या दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव सुरू आहे. या देशांतील तणावामुळे मागील काही दिवसांत, कच्चे तेल, सायोबीन तेल, गहू आणि मक्याच्या दरात वाढ झाली आहे. जाणकारांच्या मते अमेरिकेसह विकसित देशांनी रशियावर निर्बंध लादले नाही तर युक्रेनला मोठी किंमत मोजावी लागेल. युक्रेनची शेतीमाल निर्यात ठप्प होईल. परंतु या देशांनी रशियावर निर्बंध लादल्यास युक्रेन आणि युक्रेनसोबत व्यापार करणाऱ्या देशांना आयात-निर्यातीत अडचणी येतील. भारताच्या दृष्टीने विचार करता दोन्ही देशांतून सूर्यफूल तेलाची मोठी आयात होते. युक्रेन भारताला सूर्यफूल तेलाचा मोठा पुरवठादार देश आहे. मात्र, रशियाने आपल्या सिमेतून युक्रेनच्या निर्यातीवर निर्बंध आणल्यास सूर्यफूल तेल आयात प्रभावित होवू शकते. त्यामुळे युक्रेन आणि रशियाच्या वादात भारत प्रत्यक्ष सहभागी नाही. मात्र, भारताला या वादाचा थेट फटका बसू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com