रेशीम कोष वाहतुकीचे तीनतेरा

रिझर्व्हेशन केलं व मालही परळीच्या रेल्वे स्थानकावर आणला; परंतु जागा न मिळाल्याने आम्ही जवळपास १३ लोक पुढे आलो व आता मागून दुसऱ्या दिवशी माल येणार आहे. त्यामुळं नुकसान होणार हे नक्‍कीच. - व्यंकट मुंडे, रेशीम उत्पादक, पांगरी, जि. बीड.
रेशीम कोष
रेशीम कोष

बीड : रेशीम कोषाची आवक सुरू झाली अन्‌ रेल्वेने बंगळूरला जाणाऱ्या रेल्वेगाडीच्या मालवाहू बोगींची संख्या चारवरून एकवर आणली. त्यामुळे मराठवाड्यातून रामनगरमला रेशीम कोष घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गाडीत जागाच मिळत नसल्याने एकतर शेतकऱ्यांचा माल परळीच्या रेल्वे स्थानकावरच अडकून पडतो, किंवा जादा पैसे खर्चून खासगी वाहनाने माल नेण्याशिवाय पर्याय नाही.  दुष्काळग्रस्त मराठवाड्यात रेशीम शेती झपाट्याने विस्तारते आहे. त्यामुळे कोषांच्या उत्पादनात वाढ होत आहे. मात्र रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना बेंगलोर जवळ रामनगरम येथे रेल्वेने जावे लागते. नांदेड-बंगळूर या गाडीने बरेच शेतकरी रेशीम कोष घेऊन रामनगरला जातात. मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना औरंगाबाद जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक या रेल्वे स्थानकावरून आपले कोष रामनगरमला घेऊन जातात.  आधी नांदेड-बंगळूर रेल्वेगाडीला चार मालवाहतूक बोग्या असायच्या. त्यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल सुरक्षित व कमी पैशात स्वत:सोबत रामनगरमला नेता येत होता. मात्र अलीकडील काही महिन्यांत रेल्वे प्रशासनाने केवळ एकच मालवाहतूक बोगी ठेवली आहे.  या एका बोगीतील जागा नांदेड येथेच भरत असून, परभणी तसेच परळी वै. रेल्वे स्थानकावरील शेतकऱ्यांना माल टाकण्यास जागाच मिळत नाही. त्यामुळे वेळेवर रेशीम कोष बाजारात घेऊन जाणे शक्‍य होत नाही.  एक दिवस माल रेल्वे स्थानकावर पडून राहिल्यास वजनात घट, दर्जात खराबी झाल्यास मालाला अपेक्षित दरही मिळत नाहीत. जादा दर मिळण्याच्या आशेने शेतकरी रामनगरमच्या रेशीम बाजारपेठेकडे जातात. त्यामुळे राज्य रेशीम विभागाने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. 

शेतकऱ्यांना फटका  बंगळूरजवळील रामनगरम रेशीम कोष बाजारपेठ मराठवाड्यातून जवळपास एक हजार किलोमीटर आहे. रेल्वेत जागा मिळत नसल्याने नाइलाजाने शेतकऱ्यांना टेंपो किंवा पिकअप वाहनाने जीव धोक्‍यात घालून रेशीम बाजारपेठेपर्यंतचा प्रवास करावा लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वाहनात माल न्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांना भुर्दंडही बसत असून, वेळही जात असल्याचे रेशीम उत्पादकांचे म्हणणे आहे.  

प्रतिक्रिया जागा न मिळाल्यानं दवनापूर व डाभी येथील पाच ते सहा शेतकऱ्यांचा माल टेंपोनं घेऊन जातोय. एवढा लांबचा प्रवास सोपा नाहीच. पण काय करावं इलाज नाही.   - अरविंद आघाव, रेशीम उत्पादक, दवणापूर, जि. बीड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com