नांदेड, परभणी, हिंगोलीत २७७ टन रेशीम कोष उत्पादन

रेशीम कोश
रेशीम कोश

परभणी : जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत २७७.७६ टन (२७७७.६ क्विंटल) रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले. २०१६-१७ मध्ये १२७.५ टन उत्पादन झाले होते. यंदा कोष उत्पादनात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

शाश्वत उत्पन्न मिळू लागल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा कल रेशीम शेतीकडे वाढत आहे, परंतु पुरेशा मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यास अडचणी येत आहेत. परिमाणी, अनेक तालुक्यांतील शेतकरी रेशीम शेतीपासून अजूनही दूर आहेत.

नांदेड जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षी २९६ शेतकऱ्यांकडे ३४१ एकरांवर तुती लागवड होती. या शेतकऱ्यांना मार्चअखेर एकूण १ लाख ६१ हजार ९०० अंडीपुंजाचे वाटप करण्यात आले होते. त्यापासून ८५.१५० टन रेशीम कोष उत्पादन मिळाले. २०१६-१७ मध्ये २५७ शेतकऱ्यांकडे ३३० एकरांवर तुती लागवड होती. त्यांना ८६ हजार ८५० अंडीपुंजाचे वाटप करण्यात आले असताना ४२ मेट्रिक टन रेशीम कोष उत्पादन मिळाले होते.

जिल्ह्यातील ७२ गावांतील शेतकरी रेशीम शेती करत आहेत. २०१८ -१९ वर्षामध्ये तुती लागवड करण्याकरिता ३५ गावांतील ६१२ शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानाअंतर्गत नोंदणी केली आहे.

परभणी जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४७० शेतकऱ्यांकडे ४९४ एकरांवर तुती लागवड होती. त्यांना २ लाख ५४ हजार ५० अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले. मार्चअखेरपर्यंत १२२ टन रेशीम कोष उत्पादन मिळाले. २०१६-१७ मध्ये ३५५ शेतकयांकडे ३८६ एकरांवर तुती लागवड होती. तेव्हा ९४ हजार ऱ्१५० अंडिपुंजाचे वाटप केले असताना ५४ टन रेशीम कोष उत्पादन मिळाले होते.

महारेशीम अभियानाअंतर्गंत जिल्ह्यातील ३० गावांतील ७६८ शेतकऱ्यांनी ७६८ एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी केलेली आहे.

हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये १२ गावांतील ३१२ शेतकऱ्यांकडे ३२३ एकरांवर तुती लागवड होती. त्यांना १ लाख १८ हजार ३०० अंडीपुंजाचे वाटप करण्यात आले होते. त्यापासून ७०.६३० टन रेशीम कोष उत्पादन मिळाले. २०१६-१७ मध्ये ५१ हजार अंडीपुंजाचे वाटप केले असताना ३१.५ मेट्रिक टन रेशीम कोष उत्पादन मिळाले होते.

महारेशीम अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ३० गावांमधील ८०२ शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. २०१८-१९ मध्ये तुती लागवड करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात ४५ लाख तुती रोपांची रोपवाटिका (नर्सरी) तयार करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून सततची दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदी कारणांमुळे पारंपरिक पीकपद्धतीतून चांगले उत्पादन मिळत नसल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील शेतकरी काही प्रमाणात तांत्रिक स्वरूपाच्या, परंतु दर महिन्याला पगाराप्रमाणे खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे वळले आहेत.

महारेशीम अभियानाअंतर्गत या तीन जिल्ह्यांतील २१८२ शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. एकीकडे तुती लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. दुसरीकडे जिल्हा रेशीम विकास कार्यालयाकडे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. सद्यःस्थितीत या तीन जिल्ह्यांत जेमतेम १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर रेशीम शेती विस्ताराची मदार आहे.

अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांची इच्छा असूनही तांत्रिक मार्गदर्शनाअभावी त्यांना रेशीम शेती करता येत नाही. त्यामुळे या तीन जिल्ह्यांतील जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com