शाश्वत शेतीसाठी रेशीम उद्योग उपयुक्त ः हाके

जालना : ‘‘मराठवाड्यातील शाश्वत शेतीसाठी रेशीम उद्योग उपयुक्त ठरू शकतो,’’ असे प्रतिपादन औरंगाबादच्या प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक दिलीप हाके यांनी केले.
Silk Industry Suitable for sustainable agriculture : Hake
Silk Industry Suitable for sustainable agriculture : Hake

जालना  : ‘‘मराठवाड्यातील शाश्वत शेतीसाठी रेशीम उद्योग उपयुक्त ठरू शकतो,’’ असे प्रतिपादन औरंगाबादच्या प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक दिलीप हाके यांनी केले. 

खरपुडी कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित ऑनलाइन कृषी तंत्रज्ञान महोत्सवात दुसऱ्या दिवशी ‘रेशीम शेती आणि बांबू लागवड’ या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अमरावती येथील वडाळी गार्डनचे वनसंरक्षक सैय्यद सलीम अहमद यांनी बांबू लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद येथील सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार हे होते. प्रकल्प उपसंचालक आत्मा, जालना  अभिमन्यू मगर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. 

हाके म्हणाले, ‘‘रेशीम शेती ही भविष्यातील बदलत्या हवामानास सक्षमपणे तोंड देण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी रेशीम शेती हा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यामुळे तरुणांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन रेशीम शेतीत उतरावे. सध्या मराठवाड्यात जालना येथे रेशीम मार्केट उभारल्यामुळे विक्रीची समस्या सुटली आहे. तुती पिकास फार कमी पाणी लागते. म्हणून त्यास कोरडवाहू पीक म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’ 

सैय्यद सलीम म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात दरवर्षी अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. त्यामुळे शेती उद्योग हा संकटात  आहे. मजुरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. बांबू पीक यासाठी पर्याय आहे. आपल्या देशात अगरबत्तीसाठी सुद्धा बांबूची आयात करण्यात येते. तोच बांबू जर आपण लागवड केल्यास त्यापासून आपले उत्पन्न वाढेल. बांबू लागवडीमुळे जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होते. हे पीक पडीक जमिनीवर सुद्धा चांगले येते. बांबूची लागवड करताना आपल्या परिसरात उत्पादित होणाऱ्या जातींचा अभ्यास करूनच लागवड करावी व योग्य सांभाळ करावा.’’ 

केव्हीकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा व उत्पन्नात वाढ करावी, असे ‘आत्मा’चे उपसंचालक अभिमन्यू मगर यांनी सांगितले.

‘‘रेशीम शेती व बांबू लागवड हे बदलत्या हवामानास शेतीसाठी चांगला पर्याय होऊ शकेल,’’ असे डॉ. पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com