मराठवाड्यात दुष्काळामुळे रेशीम कोष उत्पादन घटले

गतवर्षी आमच्या चॉकी सेंटरवरून जवळपास ५४ हजार अंडीपुंज विक्री झाली होती. यंदा ही संख्या ३५ हजारांच्या आसपास राहिली. त्यातही मराठवाड्याऐवजी खानदेशातून जास्त मागणी राहिली. फुलंब्री तालुक्‍यात तर बहुतांश कोष उत्पादक दोनपेक्षा जास्त बॅच घेऊच शकले नाही. - वैशाली विजय डकले , डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री जि. औरंगाबाद.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : रेशीम कोष उत्पादन हा शाश्वत समजला जाणाऱ्या उद्योग यंदाच्या दुष्काळाने अशाश्वत होताना दिसत आहे. घेतलेल्या अंडीपुंजांच्या तुलनेत मिळणाऱ्या रेशीम कोष उत्पादनात घट नोंदली गेली आहे. जानेवारीपासून ही घट जास्त प्रमाणात नोंदली गेली असून, अंडीपुंजाची मागणीही मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. साधारणपणे जुन ते मार्चदरम्यान चार ते पाचपर्यंत अंडीपुंजाच्या बॅच घेणाऱ्या कोष उत्पादकांना यंदा दुष्काळामुळे अपवाद वगळता एक ते दोन बॅच घेणे शक्‍य झाले आहे. 

राज्यातील रेशीमचे क्षेत्र व कोष उत्पादनात मराठवाड्याची आघाडी आहे. बायहोल्टाइन कोषाचे उत्पादन घेण्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे रामनगरम येथील रेशीम बाजारात मराठवाड्यातील कोषांना चांगली मागणी असते. यंदा जानेवारीच्या मध्यापासून अंडीपुंजाची मागणी घटण्यास सुरवात झाली. मागणीत जवळपास ६० ते ७० टक्‍के नोंदली गेलेली घट आजघडीला औरंगाबाद जिल्ह्यात थांबल्यात जमा आहे. यापेक्षा वेगळी स्थिती जालना, बीड, उस्मानाबाद आदी दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जिल्ह्यांची नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात गतवर्षी तुतीचे क्षेत्र नवे, जुने मिळून ६४१ एकर होते. या क्षेत्रावर जवळपास १ लाख ९४ हजार अंडीपुंजांची उचल शेतकऱ्यांनी केली होती. त्या अंडीपुंजांपासून ११३ टन कोष उत्पादन झाले होते. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात तुतीचे नवीन व जुने मिळून क्षेत्र जवळपास १७०९ एकरांवर पोचले. त्यापैकी ९०१ एकर क्षेत्रावरील तुतीसाठी २ लाख ७८ हजार अंडीपुंजांची उचल कोष उत्पादक शेतकऱ्यांनी केली. या अंडीपुंजांपासून किमान १६१ टन कोषाचे उत्पादन अपेक्षित असताना केवळ १४० टनच कोषाचे उत्पादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

१०० अंडीपुंजांपासून ६० ते ८० किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन घेण्याची किमया मराठवाड्यातील रेशीम उत्पादक करतात. परंतु यंदा दुष्काळाच्या झळांमुळे १०० अंडीपुंजाला कोषाचे उत्पादन ४० ते ५० किलोपर्यंतच घेणे शेतकऱ्यांना शक्‍य झाले आहे. वातावरणात आर्द्रतेचा अभाव, कोरडेपणा कोषाचे उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरल्याचे जाणकार सांगतात.

यंदा तुतीच्या बागांची कोष उत्पादनासाठी साथ मिळाली नाही. परंतु पुढे पाउस पडल्यापासून  महिन्याभरात या बागांपासून कोष उत्पादनाला मदत होऊ शकते. त्यासाठी या तुतीच्या बागा वाचविण्याचे अभियान रेशीम विभागाने सुरू केले आहे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात  आहे, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक  आर. एस. माने यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com