सिंदखेडराजात ‘प्लॅस्टिक कल्चर इन ॲग्रीकल्चर’

सिंदखेडराजात ‘प्लॅस्टिक कल्चर इन ॲग्रीकल्चर’
सिंदखेडराजात ‘प्लॅस्टिक कल्चर इन ॲग्रीकल्चर’

बुलडाणा  ः बाष्पीभवन रोखण्यासोबतच तण नियंत्रणात पूरक ठरू पाहणाऱ्या प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर बुलडाणा जिल्ह्याचे सीड हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजा परिसरात वाढीस लागला आहे. त्यामुळेच प्लॅस्टिक कल्चर ईन ॲग्रीकल्चर असेही नवे संबोधन या भागात रूढ झाले आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरात पारंपरिक पद्धतीने भाजीपाला बिजोत्पादन केले जाते. सुमारे ६ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ढोबळी, मिरची, साधी मिरची, टोमॅटो, भेंडी, दोडकी, कारली यांसह इतर पिकांचे बिजोत्पादन शेतकरी करतात. आता शेतकऱ्यांव्दारे कापूस बिजोत्पादनही केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांचे सातत्य असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी दिली. पिंपळगाव लेंडी, चांगेफळ, शेलगाव राऊत, सिंदखेडराजा, किनगावराजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, वर्दळी, सोनोशी, खैरखेड, पिंपरखेड, नशीराबाद, सावरगावमाळ या गावांनी बिजोत्पादनात मोठी आघडी घेतली आहे.  बिजोत्पादक काही गावांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष राहते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा पर्याय मोठा आधार ठरला आहे. बाष्पीभवन कमी होते; तणाचा प्रादुर्भाव आणि कीड नियंत्रणाचा उद्देशही साधला जातो. परिणामी, शेतकऱ्यांव्दारे मल्चिंगचा वापर वाढीस लागला आहे. याची दखल घेत शासनाने अनुदानावर मल्चिंग देण्याकरिता पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. विशेष म्हणजे बिजोत्पादनामुळे या भागातील अर्थकारणदेखील समृद्ध होण्यास मदत झाली आहे. नजीकच्या काळात कंपन्यांकडून वापरात असलेले हे मल्चिंग रिसायकलिंगकरिता घेतले जाते. त्यापोटी काही पैसेही दिले जातात.

देऊळगावराजा येथे कार्यरत असताना पहिल्यांदा मल्चिंगवरील पीक लागवडीला प्रोत्साहन दिले होते. बदलीनंतर बिजोत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदखेडराजा तालुक्‍यातदेखील मल्चिंग वापराकरिता शेतकरी तयार केले. त्यामुळेच आज सहा हजार हेक्‍टरवर मल्चिंगचा वापर होत आहे. निश्‍चितच ही समाधानाची बाब आहे. शेतकऱ्यांना मल्चिंग वापराचे फायदे झाल्याने ते लागवडीसाठी याचा वापर करतात.  - वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com