सिंदखेडराजा, लोणार विकासासाठी निधी देऊ ः अजित पवार

सिंदखेडराजा, लोणार विकासासाठी निधी देऊ ः अजित पवार
सिंदखेडराजा, लोणार विकासासाठी निधी देऊ ः अजित पवार

बुलडाणा  ः जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंदखेडराजा, लोणार विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यासाठी लागणारा निधी सरकार देईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बुलडाणा जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत वित्तीय मर्यादेत एकूण २१६.३६ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. त्यात जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यानुसार अतिरिक्त ५१ कोटी २५ लाख रुपयांच्या मागणी प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, आता जिल्ह्यासाठी २६७ कोटी ६१ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी राज्यस्तर बैठक मंगळवारी (ता. २८) अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार होते.  या बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शन्मुख राजन एस,  नियोजन अधिकारी विजय शिंदे, तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा सादर केला. वाढीव मागणी प्रस्ताव विचारात घेता नियतव्ययाची मागणी केली. अतिरिक्त मागणी ही जिल्ह्यातील शाळा खोली बांधकाम व स्वच्छतागृह, अंगणवाडी बांधकाम व पोलिस वाहनांसाठी मंजूर करण्यात आली. शिवाय जिल्ह्यातील सिंदखेडराजा व लोणार येथील पर्यटन विकासासाठी निधी देण्यात येईल. लोणार सरोवर परिसरात अतिक्रमण असल्यास ते काढून टाकावे, त्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी. सरोवरात जाणारे सांडपाणी थांबवावे. शेगाव विकास आराखड्यात असलेली उर्वरित कामे पूर्ण करावी. ही कामे दर्जेदार करावीत. पांदन रस्ता विकासाकरिता मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामध्ये अकोला येथे राबविण्यात येणाऱ्या पॅटर्नचा उपयोग करावा, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com