सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाने झोडपले

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तेथील २७ गावांचा संपर्क तुटला आहे.
Sindhudurg, Ratnagiri were lashed by rains
Sindhudurg, Ratnagiri were lashed by rains

सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तेथील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. भंगसाळ नदीचे जुने पुल पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी (ता.४) सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. अनेक ठिकाणी किरकोळ पडझड झाली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली.

जिल्ह्यात गुरूवारी (ता.२) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्रभर पावसाचा जोर होता. परंतु, शुक्रवारी (ता.३) सकाळपासून पावसाने उघडीप दिली. त्यानंतर रात्री पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्या. आता पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांना पुर आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक भागांचा सपंर्क तुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. आंबेरी पुलावर पुराचे पाणी चढल्याने तेथील २७ गावांचा सपंर्क तुटला आहे. पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. मालवण तालुक्यातील पराड येथे सरक्षंक भिंत कोसळली. तर, चिंदर येथे घराचे छप्पर कोसळून नुकसान झाले. मालवण शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. 

देवगड तालुक्यात देखील एका घराची भिंत कोसळली. कणकवली शहरातील सोनगेवाडी येथे घर कोसळले. याशिवाय आणखी काही नुकसानीचे प्रकार घडले आहेत. पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे रेंगाळलेल्या भातलावणीला गती प्राप्त झाली आहे. शेतशिवारे गजबजलेली दिसत आहेत.

रत्नागिरीत नद्या भरल्या

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. सर्वदुर पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहे. मंडणगडमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे तळे साचलेले होते. मुसळधार पावसामुळे भातशेतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले. तर, नदीकिनारी पुराचे पाणी साठले असून भातशेती पाण्याखाली गेली.शनिवारी (ता.४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात मंडणगड ०.८०, दापोली ४८, खेड २९.९०, गुहागर ८२, चिपळूण ४१.४०, संगमेश्‍वर ३१.३०, रत्नागिरी ५९, लांजा ५३.१०, राजापूर ६०.६० मि.मी पावसाची नोंद झाली. कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com