वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी’तर्फे २५ लाखांची भरपाई

Sindhudurg ZP compensates Rs 25 lack to farmers
Sindhudurg ZP compensates Rs 25 lack to farmers

सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २९४ शेतकरी व बागायतदारांना गेल्या पाच वर्षांत २५ लाख रुपयांची भरपाई दिली आहे. वणवेबाधितांसाठी सहाव्या वर्षीही ही योजना राबविण्यात येत आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली.

जिल्ह्यात आंबा, काजू बागा आहेत. या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवते. मजुरांच्या अभावामुळे काही शेतकऱ्यांच्या बागेतील गवत तसेच राहते. माळरानांना वणवे लागण्याचे प्रमाण अधिक आहे. डिसेंबर ते मे महिन्यांच्या कालावधीत सातत्याने वणवे लागत असतात. त्यात अनेकदा शेतकऱ्यांने जोपासलेली बाग उद्‌ध्वस्त होते. परंतु, अशा पद्धतीने आगीत जळलेल्या बागांना शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. परिणामी, शेतकरी खचून जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेने २०१४-१५ पासून वणवेबाधितांसाठी आर्थिक मदतीची योजना अमलात आणली. जिल्हा परिषदेने स्वउत्पनातून त्यासाठी आर्थिक तरतूद केली. 

दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत जिल्हा परिषदेकडून केली जाते. कोरडवाहू क्षेत्रातील वार्षिक शेती पिकाला प्रतिहेक्टरी ४ हजार ५०० रुपये, आश्‍वासित सिंचनाखालील वार्षिक शेती पिकाला प्रतिहेक्टरी ९ हजार रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांना प्रतिहेक्टरी १२ हजार रुपये मदत देण्याचा  निकष आहे.

योजना सहाव्या वर्षीही सुरू राहणार

सातबारा नोंद, पंचनामा, कृषी समितीच्या मंजुरीनंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेनुसार २०१४-१५ मध्ये २६ लाभार्थ्यांना २ लाख ४९ हजार १२० रुपये, २०१५-१६ मध्ये ९३ लाभार्थ्यांना ७ लाख ९९ हजार ९३८ रुपये, २०१६-१७ मध्ये २३ लाभार्थ्यांना २ लाख २५ हजार ८४०, २०१७-१८ मध्ये ११९ लाभार्थ्यांना ९ लाख १४ हजार ९६१ रुपये, तर २०१८-१९ मध्ये ३३ नुकसानग्रस्तांना २ लाख ८४ हजार ६४० रुपये मदत देण्यात आली. या योजनेची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निकड आहे. त्यामुळे ही योजना सहाव्या वर्षी देखील सुरू राहणार असल्याची माहिती म्हापसेकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com