शेताबाहेर नाही गेला पावसाचा एकही थेंब...! सुभाष शर्मांच्या प्रयोगाने ओलाव्यात वाढ (video सुद्धा)

माती लाॅकींग
माती लाॅकींग

पुणे: यवतमाळ येथील नैसर्गिक शेती पध्दतीतील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांनी सरी वरंबा पध्दती व बांधबंधिस्तीद्वारे मूलस्थानी जलसंधारणाचा प्रयोग यंदाही आपल्याही शेतात केला आहे. त्याद्वारे पावसाच्या पाण्याचा एक थेंबही शिवाराबाहेर न गेल्याचे शर्मा सांगतात. अनेक वर्षांपासून ते राबवित असलेल्या या पध्दतीमुळे जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहण्यासह मातीत जीवाणूंची संख्या वाढतेच. शिवाय पीक उत्पादनातही वाढ होते असेही शर्मा यांचे म्हणणे आहे.   यवतमाळ शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आपल्या मित्राच्या शेतीत सुभाष शर्मा यांचे शेतीचे विविध प्रयोग सुरू आहेत. यवतमाळपासून सुमारे २० किलोमीटरवर तिवसा येथेही शर्मा यांची १० एकर शेती आहे. त्याच ठिकाणी सात एकर शेतीही त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. शंभर टक्के नैसर्गिक पध्दतीने शेती, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, जमिनीची सुपीकता टिकवणे, बहुविध पीकपध्दती, पाणीसंवर्धनाचे प्रयोग अशा विविध वैशिष्ट्यांनी त्यांची शेती नटली आहे.  बांधबंदिस्तीने शेतातले पाणी शेतातच जिरले.. पहा  video केवळ पीक उत्पादन नव्हे  पाण्याचे उत्पादनही महत्त्वाचे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रयोगात व्यस्त असलेल्या शर्मा यांनी यंदाही पाणी व माती संवर्धनाचा प्रयोग केला आहे. त्याविषयी ते म्हणाले, की यंदा राज्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती गंभीर होती. पाऊस खूप लांबला. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. त्याला मी देखील अपवाद नव्हतो. मात्र पाऊस सुरू झाला की त्याचं १०० टक्के पाणी शेतात थांबविण्यासाठी सर्व उपायोजना मी आधीच करून ठेवतो. पावसाचे पाणी थांबविण्यासाठी चार तंत्रांचा वापर मी करतो. शेती नैसर्गिक करणे हे त्यातील पहिले तंत्र आहे. याद्वारे ३० टक्क्यांपर्यंत पावसाचे पाणी थांबते. उर्वरित ७० टक्के पाणी थांबविण्यासाठी सरी वरंबा लॉकिंग पध्दत, कंटूर फार्मिंग व फळबांगात ‘ट्रेंचिंग’ अर्थात चर खोदणे या बाबींचा वापर करतो.  ओलावा संवर्धनासाठीचा प्रयोग  शर्मा यांनी यंदा खरिपात सरी वरंबा पध्दतीने लागवड केली आहे. यातील एका जागी हळद, दुसऱ्या जागी तूर घेतली आहे. तुरीत जमीन सुपकेसाठी, पाणी जास्त ग्रहण करण्यासाठी व थांबविण्यासाठी हिरवळीचे खत  घेतले आहे. सूर्याची शक्तीदेखील अधिक कार्यक्षमतेने घेता यावी असाही प्रयत्न आहे. अन्य एका जागी तूर आणि टोमॅटो असे मिश्रपीक घेतले आहे. सरी वरंबा पध्दतीत प्रत्येकी आठ फुटांवर ‘लॉकिंग’ केले आहे. त्यामुळे शेतात छोटे- छोटे खळगे तयार झाले आहेत. त्यांची खोली एक फूट आहे. पावसाचे पडणारे पाणी तिथेच थांबते. याचा दुसरा फायदा म्हणजे बियाणे वाहून जात नाही. तसेच दडपत नाही. पाणी- मातीचे जतन या पध्दतीमुळे पाण्याचे व मातीचे जतन होत आहे. सरी वरंबा पध्दतीमुळे वाफसा अवस्थाही राहते. नैसर्गिक शेती पध्दती असल्याने तेथे लाभदायक जिवाणूंची संख्या जास्त असते. पावसाचे साठलेले हे पाणी भूगर्भात जिरते. हा ओलावा टिकवल्यामुळे या जिवाणूंची संख्या अजून वाढते. पावसाचा आठ दिवसांचा खंड मिळाला तरी ओलावा तुटत नाही. हे सर्व फायदे या प्रयोगामुळे मिळतात. आणखी एक फायदा शर्मा सांगतात, की बियाणे वरंब्यावर लावल्याने त्याच्या वाढणाऱ्या मुळांना सकस माती मिळते. पिकाची वाढ जोमदार होते. पर्यायाने उत्पादन वाढते.  निचरा व्यवस्था  पहिले केलेले ‘लॉकिंग’ साधारण १५ दिवसांनी डवरणीद्वारे काढून टाकण्यात येते. त्यानंतर जो काही पाऊस येत राहिल त्याचे पाणी वाहून जाण्यासाठी बांधावर चर खोदले आहेत. चार फूट रूंद व तीन फूट खोल असे हे चर आहेत. पीक मोठे म्हणजे दीड महिन्यांचे झाले की त्याला पुन्हा याच पध्दतीने ‘लॉकिंग’ केले जाते. अशा रितीने वरंबा व नालीच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन करण्याची पध्दत शेतकऱ्यांनी वापरली तर त्यांनाही माझ्याप्रमाणेच फायदा होईल असे शर्मा सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com