साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा; शरद पवारांकडे मांडल्या व्यथा 

साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा; शरद पवारांकडे मांडल्या व्यथा 
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा; शरद पवारांकडे मांडल्या व्यथा 

नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे व्याजदर कमी आहेत. पण, संत्रा लागवड करायची, तर मोठा व्याजदर चुकवावा लागतो. त्यातच कधी पाण्याचा दुष्काळ, तर कधी सुकाळ, यामुळेदेखील संत्रा उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा,’’ अशी आर्जव संत्रा उत्पादकांनी करताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ या विषयावर बैठक घेणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगत त्यांना दिलासा दिला. 

राज्यात सत्तास्थापनेविषयीच्या घडामोडी रंगल्या असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारण्यांच्या डोळ्यांत अंजन घालत अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. काटोल तालुक्‍यातील संत्रा, कापूस, तूर उत्पादकांशी त्यांनी गुरुवारी (ता. १४) संवाद साधला. काटोल येथील विक्रम वानखेडे यांच्या संत्राबागेची त्यांनी पाहणी केली. या वेळी १५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु, पावसामुळे फळगळ होत आता सात लाख रुपयांतच व्यापाऱ्याने बाग मागितली, असे विक्रम वानखेडे यांनी सांगितले. 

संत्रा उत्पादक मनोज जवंजाळ यांनी श्री. पवार यांना संत्रा उत्पादनातील विविध टप्प्यांवर येणाऱ्या अडचणी, संत्रा उत्पादकांमध्ये असलेला तांत्रिक माहितीचा अभाव, त्यादृष्टीने कोणत्याच स्तरावरून न होणारे प्रयत्न, संत्रा लागवड करतेवेळी आकारला जाणारा जादा व्याजदर, अशा विविध बाबींची माहिती दिली. संत्रा व्यवस्थापनातील अडचणी जाणून घेण्याकरिता श्री. पवार यांनी शुक्रवारी (ता. १५) शेतकऱ्यांची बैठक घेण्याचे त्याचवेळी जाहीर केले. 

रविनगर येथे सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे. जामगाव फाटा येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी श्री. पवार यांचा ताफा अडवीत त्यांना खराब झालेली कपाशीची झाडे दाखविली. आम्हाला भरीव मदतीची अपेक्षा असल्याचे या शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. दिवसभराच्या या व्यस्त दौऱ्यात श्री. पवार यांनी धान उत्पादकांशीदेखील संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार अनिल देशमुख, प्रकाश गजभिये, माजी आमदार आशिष देशमुख, सुनील शिंदे होते. 

साहेब, मदत राहू द्या, कर्जमाफीच करा...  धारगाव येथील सुधीर परनाटे यांच्या कपाशीची पाहणी श्री. पवार यांनी केली. त्या वेळी शेतकऱ्याने, ‘साहेब, तुमच्या पक्षाच्या नेतृत्वात सरकार लवकरात लवकर स्थापन करा. शेतकऱ्यांना तुम्हीच न्याय देऊ शकता. त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला पीकनुकसानीसाठी तात्पुरत्या मदतीऐवजी सरसकट कर्जमाफीची अपेक्षा आहे,’ असे सांगितले. श्री. पवार यांनी या वेळी कपाशीच्या व्यवस्थापनावरील एकूण खर्च तसेच मिळणारे उत्पन्न याविषयी माहिती घेतली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com