राज्य सहकारी बॅंक घोटाळा; एसआयटी करणार तपासणी

राज्य सहकारी बॅंक घोटाळा; एसआयटी करणार तपासणी
राज्य सहकारी बॅंक घोटाळा; एसआयटी करणार तपासणी

मुंबई ः राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली. आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण तपास होणार आहे. साखर कारखाने, सूतगिरण्यांना बेहिशेबी कर्जपुरवठा करण्यासोबतच झालेल्या इतर आर्थिक गैरव्यवहारातून तब्बल २५ हजार कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप करत सुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य सहकारी बँकेसह राज्यातील सर्व जिल्हा बँकांचा यात असलेला समावेश आणि गेल्या पंधरा वर्षांतील कागदपत्रांची तपासणी या घोटाळ्याच्या तपासासाठी करावी लागणार असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. २७) विशेष तपास पथकाची स्थापना केली. आर्थिक गुन्हे शाखेने पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.  गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची कलमे असल्याने सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी महत्त्वाचा तपास करणार आहेत. तपास पथकाने तातडीने या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेत त्यांची पडताळणी सुरू केली आहे. कागदपत्रांच्या तपासणीतून ज्यांची नावे समोर येतील त्यांना या एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार असल्याचे समजते. त्यासाठी संबंधितांना एसआयटीपुढे हजर राहण्याच्या नोटीस पाठवण्यात येणार आहेत. त्यासोबत ईडीसुद्धा या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची चर्चा आहे.  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मनमानीने कर्जवाटप केल्याचा आरोप आहे. यामुळे बँकेला मोठे नुकसान झाले. या प्रकरणी यापूर्वी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर कोर्टाने या प्रकरणी नुकतेच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अजित पवार यांच्यासह ३१ जणांविरोधात सोमवारी (ता. २६) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय बँकेतील अनेक संचालकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दिग्गज नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.  दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com