agriculture news in marathi Six known viruses on Tomato in maharashtra : report from Bangalore | Agrowon

टोमॅटोवरील व्हायरस अज्ञात नाहीच; मानवी आरोग्याला धोकाही नाही

मंदार मुंडले 
शुक्रवार, 22 मे 2020

नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तर सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या टोमॅटो पट्ट्यातील शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडलेल्या व अज्ञात समजल्या गेलेल्या विषाणूजन्य रोगांचे अखेर निदान झाले आहे.

पुणे ः नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तर सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या टोमॅटो पट्ट्यातील शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडलेल्या व अज्ञात समजल्या गेलेल्या विषाणूजन्य रोगांचे अखेर निदान झाले आहे. हा अज्ञात किंवा टोमॅटो ब्राऊन रुगोस फ्रूट व्हायरस रोग असल्याचा तर्क चुकीचा असल्याचे शास्त्रीय तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याबाबतच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्या काही वृत्त वाहिन्या व समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने व त्याची तुलना मानवात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसशी केली गेल्याने टोमॅटोचे दर पडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.   

दोन्ही जिल्ह्यांमधून पाठवण्यात आलेल्या नऊ शेतकऱ्यांकडील टोमॅटोच्या सुमारे २० रोगग्रस्त नमुन्यांचे (पाने व फळे) शास्त्रीय परीक्षण व निदान बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेत (आयआयएचआर) झाले. त्यानुसार या नमुन्यांमध्ये नियमित आढळणाऱ्या सहा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळला आहे. यात मावा किडीमार्फत पसरणारा कुकूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या रोगाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८० टक्के आढळले आहे. तर फुलकिडीमार्फत पसरणारा ग्राऊंटनट बड नेक्रॉसीस व्हायरस व पांढऱ्या माशीमार्फत पसरणारा टोमॅटो क्लोरोसीस व्हायरस यांचे प्रमाण प्रत्येकी २० टक्के आढळले आहे. आढळलेल्या रोगांमध्ये टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टीबीव्हीडीव्ही) हा रोग देशात अन्यत्र असला तरी महाराष्ट्रात नवा असू शकतो. मात्र उर्वरित रोग यापूर्वी अस्तित्वात असल्याची माहिती संस्थेतील विषाणूशास्त्रज्ञ व वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. कृष्णा रेड्डी यांनी दिली. फळांवर आढळत असलेल्या लक्षणांवरून हा अज्ञात किंवा टोमॅटो ब्राऊन रुगोस फ्रूट व्हायरस रोग असल्याचे तर्क लढवले जात होते. मात्र कोणत्याही नमुन्यांमध्ये हा रोग आढळला नसल्याचेही डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. 
नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुका तर सातारा जिल्ह्यातील मिरेवाडी, साखऱवाडी, पाडेगाव आदी भागांत सध्याच्या चालू हंगामात टोमॅटोच्या पट्ट्यांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात म्हणजे काही हजारो एकरांवर झाला होता. काढणीच्या सुरूवातीला टोमॅटो पिवळा पडणे, त्याचा रंग बदलणे, आकार वेडावाकडा होणे, फळ घट्ट किंवा कमकुवत होणे अशी विविध लक्षणे दिसून येत होती. असंख्य शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचे ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले होते. प्लॉट सोडून देऊन एकरी किमान लाखाचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. एकट्या संगमनेर, अकोले भागातून सातशेच्यावर तक्रार अर्जही दाखल झाले होते. 
या पार्श्‍वभूमीवर मिरेवाडी (जि. सातारा) येथील अजित कोरडे यांनी स्वखर्चाने आपल्या शेतातील रोगग्रस्त टोमॅटोचे नमुने लॉकडाऊनच्या काळातही कुरियर सेवेद्वारे बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेकडे (आयआयएचआर) पाठवण्याचे धैर्य दाखविले होते. 

असे झाले परिक्षण 
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली संकलित केलेले रोगग्रस्त टोमॅटोचे नमुने संगमनेर येथील उपविभागीय कृषी विभागाकडून पाठवण्यात आले. संगमनेर व फलटण (जि. सातारा) भागातील नऊ शेतकऱ्यांच्या रोगग्रस्त टोमॅटो शेतातील पाने व फळांच्या एकूण २० नमुन्यांचे शास्त्रीय परिक्षण करण्यात आले. यात इलेक्र्टॉनीक मायक्रोस्कोप, इलायसा व पीसीआर या अद्ययावत तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला. याद्वारे प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार १६ नमुन्यांमध्ये मावा किडीमार्फत पसरणारा कुकूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या रोगाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८० टक्के आढळले. तर फुलकिडीमार्फत पसरणारा ग्राऊंटनट बड नेक्रॉसीस व्हायरस (जीबीएनव्ही) (टॉस्पोव्हायरस) चार नमुन्यांमध्ये म्हणजे २० टक्के प्रमाणात आढळला. पांढऱ्या माशीमार्फत पसरणाऱ्या टोमॅटो क्लोरोसीस व्हायरस (टीसीव्ही) रोगाचे प्रमाणही तेवढेच आढळले. टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टीबीव्हीडीव्ही) या माव्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचे प्रमाण तीन नमुन्यांत म्हणजे १५ टक्के तर टोमॅटो लीफ कर्ल न्यू दिल्ली व्हायरस (टीओएलसीएनडीव्ही) या पांढऱ्या माशीमार्फत पसरणाऱ्या रोगाचे प्रमाण १० टक्के (२ नमुने) व टोमॅटो मोझॅक व्हायरसचे प्रमाण १० टक्के (टीओएमव्ही) (२ नमुने) आढळले. 

प्रादुर्भावाची कारणे 
महाराष्र्टात आढळत असलेल्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव व दिसत असलेली लक्षणे (विशेषतः फळ पिवळ्या रंगाचे दिसणे) यामागील कारणे सांगताना डॉ. रेड्डी म्हणाले की कुकूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) व त्याच्यासोबत एक किंवा दोन अन्य विषाणूजन्य रोग (कॉंबीनेशन) अशी ही मुख्य समस्या राहिली आहे. फळ पक्व होण्याच्या वेळी तापमान ३५ अंश सेल्सियसच्या वरती जाणे, त्याचबरोबर अनधिकृत टॉनिक किंवा कीडनाशकांचाही वापर झाला असल्याची शक्यता देखील या कारणांमागे आहे. कोणत्या भागातून रोपे आणली आहेत ही बाबही विचारात घेण्याजोगी आहे.  

टोमॅटोवरील रोगनियंत्रण शक्य, मानवी आरोग्याला धोका नाही
बियाणे, रोपवाटिकेपासून पिकाचे व्यवस्थापन काटेकोर व प्रभावी केल्यास या रोगांचे नियंत्रण शक्य असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉ. रेड्डी यांनी केले आहे. परिक्षणात आढळलेले सर्व विषाणू हे वनस्पतीतील असल्याने मानवी आरोग्याला त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा स्पष्ट निर्वाळाही डॉ. रेड्डी यांनी दिला आहे.

‘ॲग्रोवन''ने व्यक्त केलेली शक्यता ठरली खरी 
महाराष्ट्रातील टोमॅटो पट्ट्यात सध्याच्या चालू हंगामात अर्थात लॉकडाऊननंतरच्या काळात फळांवर आढळत असलेल्या लक्षणांवरून हा अज्ञात किंवा टोमॅटो ब्राऊन रुगोस फ्रूट व्हायरस रोग असल्याचे विविध तर्क लढवले जात होते. मात्र हा रोग कोणत्याही नमुन्यांमध्ये आढळला नसल्याचे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याबद्दल व्यक्त झालेली भिती व्यर्थ ठरली आहे. राज्यातील महत्वाच्या टोमॅटो पट्ट्यात लॉकडाऊन पूर्वी तपासलेल्या नमुन्यांत तीन विषाणूजन्य रोगांचा आढळ झाला असल्याचे सविस्तर वृत्त ‘ॲग्रोवन''ने ८ मे रोजीच्या अंकात रोगांच्या शास्त्रीय नावांसहित प्रसिध्द केले होते. त्यामागे डॉ. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीचा आधार देण्यात आला होता. यामध्येही सीएमव्ही या रोगाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. लॉकडाउननंतरच्या काळात आढळत असलेल्या टोमॅटोतही याच रोगाची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ही शक्यताच खरी ठरली.

 


इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...