किसान सन्मान योजनेत सहा लाख शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज

PM-kisan
PM-kisan

पुणे : केंद्र शासनाच्या पंतप्रमंत्री किसान सन्मान योजनेतून मिळणारे प्रतिवर्षी सहा हजारांचे अनुदान प्राप्त करण्यासाठी राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांनी व्यक्तिगतरीत्या पोर्टलवर नोंदणी केली आहे. चुकलेल्या नावाची दुरुस्तीदेखील शेतकरी स्वतः करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.   केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत भाग घेण्याकरिता थेट नोंदणीची सुविधा दिली आहे. त्यासाठी https://www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर अर्ज भरता येतो. अर्जाची भाषा इंग्रजी असली तरी अर्जाची रचना सोपी असल्याने राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज भरले आहेत. “पारदर्शकता आणण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांवर थेट विश्वास दाखविण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेची मदत न घेता प्रथमच शेतकरी स्वतः नोंदणी करून थेट बॅंक खात्यात अनुदान मागवून घेत आहेत. ग्रामीण भागात स्वतः नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असली तरी इंटरनेट साक्षरता वाढीसाठी देखील ही योजना उपयुक्त ठरते आहे,” असे सूत्रांचे म्हणणे आहे.  पाच सुविधा उपलब्ध शेतकऱ्यांनी कोणत्याही मध्यस्थ किंवा दलालाची मदत न घेता किसान सन्मान योजनेसाठी नोंद करणे, दुरुस्ती करणे किंवा सद्य:स्थिती बघता येते. त्यासाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नरमध्ये पाच पर्याय देण्यात आले आहेत. त्यात नवे शेतकरी नोंदणी, आधार क्रमांक दुरुस्ती, शेतकऱ्याच्या अनुदानाची सद्य:स्थिती, लाभार्थ्यांची यादी, स्वतः किंवा सीएससीमधून केलेल्या नोंदणीची सद्य:स्थिती असे पाच पर्याय  आहेत.  आधारची मान्यता तपासली जाते प्रथम न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याने आधार नंबर टाकावा. शेजारी कॅप्चा कोड येतो. तो शेजारील चौकटीत नीट भरल्यानंतर आधी नोंदणी झालेली असल्यास तसा संदेश दाखविला जातो. नोंदणी झाली नसल्यास थेट अर्ज उघडतो. तेथे राज्य निवडून आपल्या गावाची माहिती भरल्यानंतर शेतकऱ्याने स्वतःचे नाव टाकावे. कॅटेगिरीत पुन्हा जनरल, एससी किंवा एसटीवर क्लिक करावे. त्यानंतर जमीनधारणा एक-दोन हेक्टरपर्यंत आहे की त्यापेक्षा वेगळी असे पर्याय येतात. ते क्लिक केल्यानंतर बॅंकेचा आयएफसी कोड व बॅंकेचे नाव, अकाऊंट नंबर टाकल्यास शेजारी ‘सब्मिट फॉर आधार ऑथिन्टिकेशन’ असा पर्याय आहे. तेथे क्लिक केल्यानंतर पुढे मोबाईल नंबर, जन्मतारिख व वडिलांचे नाव टाकावे.  खासरा लिहा शून्य  शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरताना पुढे सातबारा एकाचा (सिंगल) आहे की सामायिक (जॉईंट) आहे यावर क्लिक करावे. शेतकऱ्याला पुढे त्याचा सर्वेनंबर विचारला जातो. तो लिहिल्यानंतर डाग किंवा खासरा नंबर विचारला जातो. मुळात ही संज्ञा आपल्याकडे नसून उत्तर भारतात आहे. त्यामुळे तेथे शेतकऱ्यांनी शून्य टाकावा. पुढे आपले क्षेत्र टाकून पुढे ‘अॅड’ या पर्यायाला क्लिक करावे. त्यानंतर ‘मी ही माहिती खरी असल्याचे घोषणापत्र लिहून देत आहे’ अशी ओळ असून त्याच्या पुढे क्लिक करून ‘सेव्ह’ पर्याय दाबला शेतकऱ्याचा अर्ज पोर्टलवर नोंदणीसाठी जातो.  पुढची जबाबदारी तलाठ्याची ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने आपला सातबारा, खाते पुस्तकाची प्रत आणि आधारनंबरची नक्कल अशा ‘हार्डकॉपीज’ आपल्या गावच्या तलाठी कार्यालयात जमा कराव्यात. कारण, राज्य शासनाने शेतकरी सन्मान योजनेची ग्रामपातळीवरची माहिती संकलित करण्याची जबाबदारी तलाठ्याला दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याने ऑनलाइन अर्जासाठी भरलेल्या नोंदीच्या वरील तीन कागदांच्या प्रती तलाठ्याच्या ताब्यात देऊन त्या मिळाल्याची पोच घेऊन ठेवावी. त्यामुळे नंतर वाद झाल्यास आपल्याकडे पुरावा म्हणून पोच दाखविता येते.  तहसीलदार देतात अंतिम मान्यता शेतकऱ्याने केंद्र शासनाच्या पोर्टलवर जाऊन शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरल्यानंतर पुढे त्याचे काय होते ते अनेकांना कळत नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन भरलेले अर्ज पुढे तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयातून संबंधित गावच्या तलाठ्याकडे तपासणीसाठी येतात. त्यामुळे बोगस अर्ज नाही ना, याची खात्री तलाठी करतात. पुढे ही यादी तहसीलदार पातळीवरून अंतिम केली जाते. हीच माहिती पुढे दिल्लीत केंद्र शासनाला जाते. केंद्राकडून राज्यातल्या कोणत्याही यंत्रणेला मध्यस्थी न ठेवता या यादीनुसार थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात दोन हजारांची रक्कम पाठविली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली. हाती तयार ठेवा ‘हे’ तीन कागदपत्र  शेतकरी घर बसल्यादेखील नोंदणी करू शकतात. किसान सन्मान योजनेत नोंदणी किंवा दुरुस्ती करण्यापूर्वी आधार नंबर, बॅंक खाते पुस्तक आणि सातबारा उतारा तयार ठेवावा लागतो. मात्र, इंटरनेट सुविधा नसल्यास गावातील सामूहिक सेवावर केंद्रा (सीएससी) फक्त १५ रुपये शुल्क देऊन नोंदणी होते. दुरुस्तीसाठी केवळ १० रुपये शुल्क असून कोणत्याही सीएससीचालकाने लूट केल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com