सातारा जिल्ह्यात आठ कारखान्यांकडून सहा लाख टनांचे गाळप 

Six million tonnes of sugarcane from eight factories
Six million tonnes of sugarcane from eight factories

सातारा : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी १४ साखर कारखान्यांनी गळीत सुरू केले आहे. आत्तापर्यंत आठ कारखान्यांनी एकूण सहा लाख २२ हजार ६८८ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सहा लाख ३० हजार दहा क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी १०.९ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर सहा कारखान्यांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. गाळपाने गती घेतली नसली तरी आगामी महिन्यात बाहेरील कारखाने उसाची पळवापळवी करण्याची शक्‍यता आहे.  

यावर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने बहुतांशी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यास एक महिना उशीर झाला. त्यामुळे अनेक कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळीत झाली होती. नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू झाले. उशिरा हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणीस विलंब झाला असला तरी साखर उतारा चांगला मिळत आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत हंगामाने अपेक्षित गती घेतलेली नाही. त्यामुळे गाळपाची आकडेवारी कमी दिसत आहे. सध्या बहुतांशी कारखान्यांकडून कार्यक्षेत्रातील तोडणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पुढील काळात उसाचे झालेले नुकसान तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होऊ शकणार आहे. त्यापूर्वीच जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपास गती देणे आवश्‍यक आहे. जानेवारी महिन्यात बाहेरील कारखाने जिल्ह्यात येऊन शिल्लक ऊस पळविण्याची शक्‍यता आहे. 

सध्या गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता अद्याप कारखान्यांनी जाहीर केलेला नाही. शेतकरीही गाळप झालेल्या उसाचे बील किती निघणार? या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक कारखान्याची एफआरपी वेगवेगळी असल्याने कोणाचा दर किती निघेल? याबाबत शेतकऱ्यांत संभ्रमावस्था आहे. ‘एफआरपी’चे तुकडे करून बिले देण्याची तयारी कारखाने करत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना ऐन हंगामात आंदोलन पेटविण्याची भीती आहे. साखरेचे किमान विक्री मूल्य ३१०० रुपये आहे. कायद्यानुसार गाळप केलेल्या उसाला १४ दिवसांत पहिली उचल देणे बंधनकारक आहे. मात्र, अजून कोणत्याही कारखान्याने दराची कोंडी फोडलेली नाही. 

कारखानानिहाय ऊस गाळप (मेट्रिक टनामध्ये) : अजिंक्‍यतारा : ७३,१८०, सह्याद्री : १,४३,३००, कृष्णा १,६१,१९०, किसन वीर : ६,८००, श्रीराम फलटण : ५८,१३८, बाळासाहेब देसाई कारखाना : २६,९००, जरंडेश्‍वर : १,२८,६३०, न्यू फलटण शुगर साखरवाडी २४,५५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com