अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विद्यमान ११ पैकी सहा आमदारांना जनतेने लोकसभेत पाठविले आहे तर पाच आमदारांना मतदारांनी दिल्लीत जाण्यापासून रोखले आहे. खासदार म्हणून निवडून गेलेल्या विधानसभा सदस्यांमध्ये अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या आमदारांना १५ दिवसांत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील आव्हान लक्षात घेऊन भाजप, काँग्रेस तसेच शिवसेनेने आपल्या काही विद्यमान आमदारांना लोकसभेचे तिकीट दिले होते. खासदारकीसाठी शिवसेनेचे विदर्भातील आमदार सुरेश धानोरकर यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि अखेरच्या क्षणी तिकीट मिळविले होते. संसदेत प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या के. सी. पाडवी, कुणाल पाटील, संग्राम जगताप, भाऊसाहेब कांबळे, सुभाष झांबड या विधिमंडळ सदस्यांना पराभवाचा दणका बसला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने सुरवातीला विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शेवटच्या क्षणी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आले. पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यावर मात केली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने सुरवातीला विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली होती. परंतु, बांगडेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेश धानोरकर यांना तिकीट दिले. धानोरकर यांनी त्यासाठी आमदारकीवर पाणी सोडले. चंद्रपूरमधील निकराच्या लढाईत धानोरकर यांनी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. शिवसेनेने हिंगोलीत नांदेड शहरातील आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. पाटील यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला.

नांदेडमध्ये काँग्रेस उमदेवार अशोक चव्हाण यांना अस्मान दाखविणारे प्रतापराव पाटील-चिखलीकर हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र, नांदेड महापालिका निवडणुकीवेळी चिखलीकर यांनी टोपी फिरवली आणि ते भाजपमध्ये दाखल झाले. भाजपने त्यांना नांदेडमधून उमेदवारी दिली आणि ते काँग्रेसचे ‘हेवीवेट’ नेते अशोक चव्हाण यांचा पराभव करून निवडून आले.

औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि आमदार इम्तियाज जलील निवडून आले आहेत. जलील हे एमआयएमचे आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. येथून काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सुभाष झांबड हेही निवडणूक रिंगणात होते. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपच्या डॉ. सुजय विखे-पाटील यांना झुंज दिली. मात्र, यात जगताप यांना अपयश आले. शिर्डीतून काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.   हे विधिमंडळातून संसदेत दाखल 

  • उन्मेष पाटील (भाजप)
  • सुरेश धानोरकर (काँग्रेस)
  • हेमंत पाटील (शिवसेना)
  • प्रतापराव पाटील-चिखलीकर (भाजप)
  • इम्तियाज जलील (एमआयएम)
  • गिरीश बापट (भाजप)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com