सोलापुरातील सहा कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

सोलापुरातील सहा कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
सोलापुरातील सहा कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

सोलापूर  ः एफआरपीचे पैसे थकविल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर, गोकूळसह सहा साखर कारखान्यांची साखर, मालमत्ता जप्त करण्याचे (आरआरसी कारवाई) आदेश साखर आयुक्तांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकरी संघटेनेच्या आंदोलनाच्या जोरानंतर प्रशासनाला हा निर्णय घेणे भाग पडले. आता कारवाईसाठी कोणतीही नोटीस न देता थेट संबंधित कारखान्याने उत्पादित केलेली साखरेसह मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.

राज्यभरातील पाच हजार कोटींच्या थकबाकीमध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यात ९३८ कोटींची थकबाकी आहे. ऊस नेल्यापासून १४ दिवसांच्या आत एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. पण अनेक कारखान्यांनी पैसे जमा केले नाहीत. काहींनी केले, पण ते पुरेशा प्रमाणात केले नाहीत. कारखान्याच्या त्या-त्या ऊसबिले वाटपाच्या पद्धतीनुसार कारवाईचा हा निर्णय ठरणार आहे. 

पण पहिल्या टप्प्यात सहा साखर कारखानदारांवर कारवाईचा बडगा साखर आयुक्तांनी उचलला आहे. त्यात उत्तर सोलापुरातील सिद्धेश्‍वर, दक्षिण सोलापुरातील गोकूळ, जयहिंद शुगर, करमाळा तालुक्‍यातील विठ्ठल रिफाईंड, माढा तालुक्‍यातील संत कुर्मदास, बबनराव शिंदे साखर कारखाना यांचा या कारवाईत समावेश आहे. 

या कारवाईसाठी आता कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट कारवाई करण्यात येणार आहे. आरआरसीच्या कारवाईनुसार कारखान्याची मालमत्ता तसेच साखर जप्त करण्यात येते. दरम्यान, साखर आयुक्तांचे आदेश मिळाले आहेत. आयुक्तांच्या आदेशांनुसार सहा कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. येत्या दोन दिवसांत कारवाई सुरू होईल, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com