सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट खत

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या वर्षी व शासकीय धान्य गोदामातील सहा हजार क्विंटल धान्य भिजले होते. आता या सडलेल्या धान्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे.
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट खत
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट खत

भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या वर्षी व शासकीय धान्य गोदामातील सहा हजार क्विंटल धान्य भिजले  होते. आता या सडलेल्या धान्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार असून, जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पाठवलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे.  मध्य प्रदेशातील प्रकल्पांची पातळी वाढल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गेल्या वर्षी वैनगंगा नदीला महापूर आला होता. या महापुराचे पाणी शासकीय गोदामात शिरले. गोदामात पाच ते सहा फूट पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात धान्य भिजले. या गोदामातील १७ हजार क्विंटल धान्यापैकी तब्बल ६२६३ क्विंटल धान्य महापुरात नष्ट झाले. त्यात तांदूळ ३८२६ क्विंटल, गहू १८३३,  तूरडाळ २६६, चणाडाळ १८८, साखर १४४ क्विंटल याप्रमाणे समावेश होता. त्या वेळी भिजलेले धान्य सुकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. चांगले धान्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. मात्र भिजलेल्या धान्याच्या प्रचंड दुर्गंधीमुळे प्रसिद्ध परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. खराब झालेल्या धान्या बाबत २८ ऑक्टोबर १९९९ च्या निर्णयानुसार विल्हेवाटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. परंतु त्याला मंजुरी न मिळाल्याने वर्षभरापासून धान्य गोदामात पडून होते. आता शासनाने जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार या धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी संतोष गहणकर यांनी दिल्या आहेत. यानुसार धान्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार असून, त्याकरिता हे अखाद्य धान्य कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागात देण्यात यावे असे निर्देश शासनाने दिले आहेत. संयुक्तरीत्या विल्हेवाट... जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे भिजलेले हे धान्य कंपोस्ट खत तयार करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या साकोली येथील कृषी विज्ञान केंद्रात पाठविले जाणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनात तहसीलदार आणि कृषी विभाग संयुक्तरीत्या या धान्याची विल्हेवाट लावणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com